सांगली : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मेंदुमृत झाल्यानंतर मिरजेतील सेवासदन रुग्णालयातून पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलला त्याचे अवयव साडेतीन तासांत पोहोच करण्यात आले. यामुळे गरजू रुग्णास वेळेत अवयव मिळाल्याने जीवदान मिळाले. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी दिवंगत लष्करी अधिकाऱ्याला राष्ट्रगीत म्हणत सलामी दिली.
निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन लक्ष्मण रामचंद्र शिंदे (वय ७० रा. म्हैसाळ) यांना सेवासदन रुग्णालयात दि.१६ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दि. २९ ऑगस्ट रोजी मेंदुमृत (ब्रेनडेड) झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिवंतपणीच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगितले. यामुळे त्यांचे अवयवदान करण्यासाठी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलशी संपर्क साधण्यात आला. तत्काळ अवयवदानाची तयारी करण्यात आली. शुक्रवारी रुग्णाचे यकृत व त्वचा खास वाहनाने पुण्याला पाठविण्यात आले. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी, सुनील गिड्डे यांनी वाहतूक मार्ग खुला करून दिला.
हेही वाचा – कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर
सेवासदनचे डॉ. रविकांत पाटील, डॉ. अमृता दाते, डॉ. दीपा पाटील, योगेश पाटील, डॉ. मयुरेश दातार यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांची अवयव दान पुनर्प्राप्ती करणारे पथक, सेवासदनचे शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी यांनी रुग्णाचे यकृत व त्वचा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलकडे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. रुग्णालयातून खास वाहनाने अवयव साडेतीन तासांत पुण्यात पोहोचविण्यात आले.