सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड मंगळवारी होणार आहे. यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे. मिरज पंचायत समिती वगळता अन्य तालुक्यात राजकीय चुरस फारसी नाही.
मिरज पंचायत समितीच्या २२ जागापैकी १० जागा भाजपने जिंकल्या असून विरोधी पक्षांकडून १२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, यामध्येही राष्ट्रवादी अजित पवार गट ३, राष्ट्रवादी शरद पवार गट ४, काँग्रेस ३ आणि शिवसेना २ असे विविध पक्षाचे सदस्य आहेत. यामुळे सभापती पदासाठी सर्व भाजप विरोधक एकत्र येणार की विरोधकात फूट पडणार यावर सभापती पद अवलंबून आहे.
मिरज पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपकडून राणी भोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रिदा मुजावर आणि काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या दावेदार आहेत. तथापि, सभापती पदाला साथ देण्याच्या बदल्यात उपसभापती पद विरोधी गटाला दिले जाण्याची चर्चा भाजपच्या गटात आहे. कोणत्याही स्थितीत मिरजेत भाजपचाच सभापती होणार असल्याचा दावा भाजपचे विधानसभा प्रमूुख काकासाहेब धामणे यांनी केला आहे.
दरम्यान, पलूस व कडेगाव येथे काँग्रेस, वाळवा व कवठेमहांकाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, विटा, आटपाडीमध्ये शिवसेना शिंदे गट, जतमध्ये भाजप व शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. यामुळे या ठिकाणी सभापती निवडीसाठी पक्षातंर्गत चुरस असली तरी राजकीय पक्षात चुरस फारशी नाही. जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर निश्चित करतील त्यांना सभापती पद मिळणार आहे. वाळव्यात आमदार जयंत पाटील, पलूस व कडेगावमध्ये आमदार डॉ.विश्वजित कदम, खानापूरमध्ये आमदार सुहास बाबर, आटपााडीमध्ये आमदार बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या सल्ल्याने सभापती पद निश्चित केले जाणार आहे.
