सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतींची निवड १० मार्च रोजेी होणार आहे. सभापती व उपसभापती निवडीसाठी उप जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची विशेष बैठक दि.१० मार्च रोजी बोलावण्यात आली असून यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.

सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होउन ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले. जिल्हा परिषदेच्या ६१ आणि पंचायत समितीच्या १२२ सदस्यांची निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या  माध्यमातून करण्यात आली. मात्र, पदाधिकारी निवडी  जाहीर झालेल्या नव्हत्या.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम  जाहीर केला आहे.या कार्यक्रमानुसार १० मार्च रोजी सकाळी  ११ ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता  येतील. उमेदवारी अर्जांची छाननी १२ ते साडेबारा या वेळेत होईल. उमेदवारी मागे घेण्यासाठी साडेबारा ते एक वेळ देण्यात आली आहे. यानंतर आवश्यकता असेल तर दुपारी २ वाजता मतदान होउन सभापती निवड होणार आहे.

दहा पंचायत समितीपैककी खानापूर, आटपाडी पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असेल. मिरज व जतमध्ये भाजप, वाळवा व कवठेमहांकाळमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, पलूस व कडेगावमध्ये काँग्रेसचे बहुमत आहे.

आटपाडी, वाळवा, कडेगाव या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी, कवठेमहांकाळ, तासगाव व जत  मध्ये  सर्वसाधारण महिला आणि  पलूसव शिराळा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, खानापूर येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि मिरज अनुसूचित  जाती महिला यासाठी सभापती पद आरक्षित आहे.

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड झाल्यानंतर आठ दिवसात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.