सांगली : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १५ वर्षात जप्त करण्यात आलेला कोकेनसह एक टनाहून अधिक गांजा गुरुवारी जाळून भस्मसात करण्यात आला. भस्मसात करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे बाजारी मूल्य २ कोटी १५ लाख रुपये होते.

पोलीस अधीक्षक तथा अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष तुषार दोशी यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारावकर, उप अधिक्षक गजानन सरगर, गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे पोलीस यांच्यासह कोल्हापूर विभागाचे रासायनिक विश्लेषक, वैध मापनचे क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळया १७ पोलीस ठाणेकडील एन.डी.पी. एस. ॲक्ट १९८५ प्रमाणे लागवड, वाहतुक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्हयातील सन २००९ पासून ते सन २०२६ पर्यतचा मुद्देमाल केंद्रीय अंमली पदार्थ गोदामामध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला होता. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याचाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करणेबाचत आदेशीत केले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील कर्मचारी संकेत मगदुम, अतुल माने, सोमनाथ पतंगे व संबंधित पोलीस ठाण्याकडील कारकुन यांनी अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यासाठी  न्यायालयात पाठपुरावा केला होता. वेगवेगळ्या १७ पोलीस ठाणेकडील ६५ गुन्हयातील मुद्देमाल नाश करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच  पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, सीआयडी, पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाश बाबत परवानगी घेवून तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्हयात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समिती स्थापन केली. या समितीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाउन मध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला गांजा, कोकेन मुद्देमाल अंमली पदार्थांचा गुरुवारी नाश करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्यांमध्ये १०२१ किलो गांजा, २७६ ग्रॅम कोकेन या अंमली पदार्थांचा समावेश होता. औद्योगिक वसाहतीतील सुर्या सेंटर ट्रेटमेंट फॅसिलिटी येथे योग्य त्या नाश प्रक्रियेनुसार बॉयलरमध्ये जाळून अंमली पदार्थ नाश करण्यात आला.

 यावेळी कोणत्याही प्रकारचे प्रदुषण व त्यामुळे आजुबाजूचे परीसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन दल यावेळी तैनात करण्यात आले होते.