सांगली : सायबर स्क्वेअर व दुबई विद्यापीठ यांच्यावतीने १० मे रोजी दुबई येथे होणाऱ्या पाचव्या ग्लोबल डिजिटल फिस्टमध्ये इस्लामपुरातील प्रकाश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विद्युत वाहन प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या रुद्र किरण सुळे व पृथ्वीराज अविनाश पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सायबर स्क्वेअर ही एक माहिती तंत्रज्ञान कंपनी असून, शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. याचबरोबर प्रकल्पासाठी प्रोत्साहान देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनेनुसार प्रकल्प साधने पुरविली जातात. प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर हे सायबर स्क्वेअर अभ्यासक्रम सुरू करणारे व रोबोटिक्स लॅब तयार करणारे राज्यातील पहिले विद्यालय आहे.
दुबई येथे या फिस्टमध्ये विविध प्रकल्प घेऊन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या ग्लोबल फिस्टमध्ये विद्यार्थी इलेक्ट्रिक व्हेईकल हा प्रोजेक्ट तीन टप्प्यात सादर करणार आहेत. पहिला टप्पा हा मिनेअजर इलेक्ट्रिक व्हेईकल, दुसरा टप्पा कॉम्पॅकट व्हेईकल आणि तिसरा टप्पा इलेक्ट्रिक व्हेईकल हा आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ही नोकरदारांसाठी उपयुक्त आहे.हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील, प्रशासन प्रमुख सुनीता भोसले- पाटील, प्राचार्य मधुकुमार नायर, उपप्राचार्या सिंधु नायर, संगणक विभागप्रमुख सुनीत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.