सांगली : रात्रीपासून कमी झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर पुन्हा वाढला आहे. वारणा नदीची पाणी पातळी सततच्या पावसामुळे वाढत असल्याने सतर्क प्रशासनाकडून आज शिराळा येथे गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी व कार्यकर्त्यांना राज्य प्रतिसाद दलाच्या सैनिकांकडून बचाव कार्याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. पश्चिम भागात पडलेल्या संततधार पावसाने चांदोली धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्याहून अधिक झाला असून वारणा नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर आहे. गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यात सरासरी केवळ ७.३ मिलीमीटर पाउस झाला.
काल सायंकाळी एक सर आल्यानंतर पावसाने पूर्ण उघडीप दिली असून आज चार दिवसानंतर सुर्यदर्शन झाले.ढगाळ हवामान कायम असल्याने उन्हाची तीव्रताही अधिक जाणवत होती. सलग चार दिवस कमी अधिक पडत असल्याने निर्माण झालेला हवेतील गारवाही आजच्या तीव्र उष्म्यामुळे गायब झाला आहे. दुपारनंतर जोरदार वारे सुरू झाल्याने पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळी सांगली, मिरज शहरात जोरदार पावसाच्या सरी आल्या. शाळा सुटण्याच्या वेळी संततधार पावसामुळे शाळकरी मुलांची त्रेधा उडाली.
वारणेच्या खोर्यात पावसाचा जोर असल्याने ओढे नाले दुथडी भरून वाहत असून वाकुर्डे येथील तलाव शंभर टक्के भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. वारणा नदी अद्याप पात्राबाहेर असून मळीतील शेकडो एकर क्षेत्रावरील उस पिकात पाणी शिरले आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज, निवळी व धरण क्षेत्रात सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली असून बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली येथे १४६ मिलीमीटर पाउस पडला. धरणातील पाणीसाठा १७,८८ दशलक्ष घनफूट झाला असून क्षमतेच्या ५२ टक्के धरण भरले आहे. कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाउस पडत असल्याने नदीतील पाणी पातळी वाढली आहे. सांगलीत आयर्विन पूलाजवळ मंगळवारी सायंकाळी २० फूट असलेली पाणी पातळी एका रात्रीत ३ फूट ९ इंचांनी वाढून २३ फूट ९ इंच झाली असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ५.२, जत १, खानापूर ५.३, वाळवा ६, तासगाव ३.८, शिराळा २९.८, आटपाडी १.२, कवठेमहांकाळ ७.२, पलूस ७ आणि कडेगाव ११ मिलीमीटर.
