सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरूवारी १२ मतदान केंद्रावर ९९.८९ टक्के मतदान झाले. मतदान अत्यंत शांततेने पार पडले असून सातारा अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळामुळे यावेळी मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. भाजपचे धैर्यशील कदम मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे, तर महाविकास आघाडीने यावेळी चमत्कार होईल असे म्हटले आहे.

सांगली व सातारा जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य व तालुका सभापती मतदार असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ अशी तिरंगी लढत झाली. मात्र, खरी चुरस महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच होती.

सकाळी बारा वाजेपर्यंत फलटण केंद्रावर एकही मतदान झाले नव्हते, तर ईश्‍वरपूरच्या केंद्रावर ८२ पैकी एक आणि कोरेगाव केेंद्रावर ४२ पैकी एक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दोन वाजेपर्यंत ईश्‍वरपूर केंद्रावर २९.२७ तर फलटण केंद्रावर ३२.२६ टक्के मतदान झाले, मात्र, पाटण व  जत मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजताच संपूर्ण १०० टक्के मतदान पार पडले होते.

दोेन्ही जिल्ह्यातील विटा वगळता अन्य सर्व ११ मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले आहे. विटा मतदान केंद्रावरील खानापूर नगरपंचायतीचे एक  सदस्य वैयक्तिक अडचणीमुळे मतदानास उपस्थित राहू शकले  नाहीत. यामुळे या निवडणुकीत  ९९.८९ टक्के मतदान पार पडले.  ८९५ पैकी ८९४ मतदारांनी आपला मतदानाचा हयक बजावला. मतदान केंद्रनिहाय मतदान झालेली संख्या अशी- सातारा जिल्हा- वाई ११०, फलटण ३१, माण ५८, कोरेगाव ४२, सातारा १५२, पाटण १९, कराड ६०, सांगली- कडेगाव ४२, विटा ९६, ईश्‍वरपूर ८२,सांगली १५७ आणि जत २३.

या निवडणुकीत महा युतीचे मतदान फुटल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत असला तरी महायुतीच्या उमेदवाराला संख्याबळापेक्षा  अधिक मते मिळतील असा दावा भाजपकडून करण्यात आला. महायुतीचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर आदी नेते  मतदारांवर नजर ठेवण्यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये थांबून होते.

दरम्यान, सर्व बारा मतदान केंद्रावरील मतपेट्या सांगलीत आणल्या जात आहेत. तरूण भारत व्यायाम शाळेच्या कार्यालयात सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी मतमोजणी होणार असून यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासमवेत विविध मतदान केंद्रांना भेटी देउन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली.