सांगली : शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे निवडणूक लढवतील, अशी घोषणा माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख मंडळी व कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करून विरोधकांना नगरपंचायतीमध्ये एकही जागा जिंकता येणार नाही अशी व्यवस्था करावी, असे आवाहनही त्यांनी केले. माजी नगरसेवक अभिजित नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वैशाली नाईक, विक्रमसिंह नाईक, गायत्री नाईक यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आयोजित कार्यक्रमात श्री. नाईक बोलत होते.

श्री. नाईक म्हणाले, ‘शिराळ्यात विरोधकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून हातात हात घालून काम केल्यास विरोधकांना एकही जागा जिंकता येणार नाही. विरोधकांना आतापर्यंत शिराळ्याच्या विकासाविषयी जनतेची दिशाभूल केली आहे. तोरना ओढा सुशोभीकरण, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम यासह अनेक कामांना खोडा घालण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामे आणून शिराळ्यासाठी काही तरी करीत असल्याचे ते भासवत आहेत. मी प्रत्यक्षात शिराळ्यात कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. शहरात अनेक सोई-सुविधा निर्माण केल्या आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘मी लोकप्रतिनिधी असताना शैक्षणिक प्रबोधन करणे या मुद्द्याखाली नागपंचमीला प्रत्येक मंडळातील चार कार्यकर्त्यांना नाग हाताळण्याची परवानगी आणली होती. मात्र त्या वेळी काही मंडळी व विरोधकांनी हे मान्य केले नाही. अशी प्रथा पाडल्यास तीच कायम होईल, म्हणून त्यांनी विरोध केला. आता त्याच मुद्द्याखाली मोजक्या लोकांना परवानगी मिळवून नागपंचमी उत्सवाचा राजकीय वापर केला जात आहे.’

युवा नेते विराज नाईक म्हणाले, ‘प्रत्येक प्रभागात मोठे जनमत बाजूने असणारा उमेदवार दिला जाईल. आजच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, कार्यकर्त्यांत उत्साह आला आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना एकही जागा मिळणार नाही, याची काळजी घेऊन जोमाने काम करायचे आहे, याची खूणगाठ मनाशी बांधावी.’

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक युवकचे शहराध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले. या वेळी विश्वास साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम, माजी सरपंच प्रमोद नाईक, विवेक नाईक, दूध संघाचे संचालक भूषण नाईक, माजी सरपंच देवेंद्र पाटील, अजय जाधव, माजी जि. प. सदस्य प्रवीण शेटे व महादेव कदम, राष्ट्रवादी शिराळा शहराध्यक्ष सुनील कवठेकर यांच्यासह शिराळा शहरातील अनेक मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी, व्यापारी, युवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.