सांगली : विट्यातील रेयांश दीड महिन्याचा असताना हृदयाला छिद्र असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सहा वर्षांचा झाल्यानंतर पुन्हा एकदा अशीच वेळ आली. हृदयाची झडप छोटी असल्याने त्रास होत असल्याचे निदान तज्ज्ञांनी केले. शस्त्रक्रियेसाठी दहा लाख एवढी रक्कम उभी करणे पालकांना शक्यच नव्हतेे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि आ. सुहास बाबर यांच्या प्रयत्नाने त्याच्यावर जोखमीचा व खर्चिक उपचार मुंबईतील रुग्णालयात पार पाडल्यानंतर रेवांश आता सामान्य जीवन जगत आहे.
रेयांशचे वडील एका कापड दुकानात काम करतात, तर आई गृहिणी. जन्मताच त्याला हृदयाला छिद्र असल्याचे समजले. अवघा दीड महिन्यांचा असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सगळं काही ठीक चालले होते. आता तो शाळेतही जावू लागला.
दरम्यान, जिल्हाधिकारी काकडे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत इको शिबिर घेण्यात आले. या तपासणीत रेयांशच्या हृदयाची झडप छोटी असल्याचे आढळले.
अल्प वयात एवढी जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची चिंता होतीच. शिवाय सगळ्यात मोठा अडथळा होता तो आर्थिक निधीचा, कारण शस्त्रक्रियेचा खर्च दहा लाख रुपये होता. पवार कुटुंबासाठी ही रक्कम उभारणे पूर्णपणे अशक्य होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य योजनेतून एक लाख पंच्याहत्तर हजारांची मदत तत्काळ मंजूर केली. पण उर्वरित आठ लाख पंचवीस हजारांचे काय? असा प्रश्न होता.
आमदार बाबर यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या. या टप्प्यावर जिल्हाधिकारी काकडे यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊ घातलेल्या ठाण्यातील एम.आर.आर. हॉस्पिटलशी संपर्क साधून शक्य त्या सर्व मार्गाने उपचाराची रक्कम उभारण्याचे आवाहन रुग्णालय व्यवस्थापनाला केले. या सर्वांच्या आवाहनाला एम.आर.आर. रुग्णालय व्यवस्थापक योगेश खाचणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी केलेल्या यशस्वी समन्वयातून उद्योजक, व्यावसायिक आणि समाजातील दात्यांकडून उपचारासाठी लागणारा संपूर्ण आठ लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
एमआरआर रुग्णालयातील बालहृदयतज्ज्ञ डॉ. सारंग गायकवाड, डॉ. नीलेश बच्छाव यांनीही पालकांचे समुपदेशन केले आणि यशस्वी उपचाराची दिशा दाखवली. सांगलीतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस यांनी उमेद जागवली. महिनाभरापूर्वी रेयांशवर गुंतागुंतीची, जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली.