सांगली : तासगाव मतदार संघासाठी केवळ आश्‍वासने न देता सर्वांगिण विकासासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला असून याची पूर्ती करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकासाचा ध्यास घेणारा अधिकृत जाहीरनामा (वचननामा) आ. पाटील यांनी आज प्रसिद्ध केला.

यावेळी अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, शंकर पाटील, विश्वास पाटील, मोहन पाटील, पतंग माने, साहेबराव पाटील, युवराज पाटील यांच्यासह दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे असे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत जलसिंचन योजना, आधुनिक शेती सुविधा तसेच मृदा व जल परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करणार. प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याचे पाणी व शेतीसाठी भरपूर बियाणे उपलब्ध करून देणे. गावासाठी पक्के रस्ते, गटार व्यवस्था व ग्रामविकासाला चालना दिली जाईल. महिला बचत गटांचे बळकटीकरण, अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण व बालविकासावर भर देणार.जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारणे, डिजिटल वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधा वाढविणे व रुग्णवाहिका सेवेला विस्तार. युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करणार आदी आश्‍वासने या वचननाम्यात देण्यात आली आहेत.

तासगाव व कवठे महांकाळ पंचायत समित्यांमध्ये सत्तेत आल्यास जिल्हा परिषद शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचा ठराव करण्याचा निर्धारही यावेळी जाहीर करण्यात आला. तसेच लोकांना न्याय देणारा हा जाहीरनामा असून विकासाच्या प्रवासात जनतेने भक्कम साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

नगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव होण्यामागे केवळ बोगस मतदान कारणीभूत असल्याचा आरोप करून आमदार पाटील म्हणाले, नगरपालिका निवडणुकीसाठी मांजर्डे, पेड, हातनोली, हातनुर, सांगली, सांगलीवाडी या ठिकाणाहून मतदार आणून ९५० बोगस मतदान करण्यात आले बंडखोर उमेदवार व क्रॉस वोटिंग तसेच धनशक्तीचा वापर झाल्याने त्याचा फटका आम्हाला बसला असा आरोपही त्यांनी केला.