बंद घराचे कुलूप तोडून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना संजयनगर ठाण्यातील पोलिसांनी २४ तासांत जेरबंद करून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
सुशिला बेन्नाळ (रा. बाळकृष्ण नगर) या महिलेच्या घरातून सोन्याची बोरमाळसह चांदीचे पैंजण, १२ हजारांची रोकड लंपास करण्यात आली होती. याची तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार दिनेश माने व पथकाने कसून चौकशी सुरु केली. गस्त चालू असताना दोघे विना नंबरच्या मोपेडवरुन जात असल्याचे दिसले. झडती घेतली असता दुचाकीच्या डिकीमध्ये सोन्याचे दागिने, पूजेसाठी वापरले जात असलेल्या चांदीचे पान, सुपारी, दुर्वा, मोदक आढळले.




या प्रकरणी आकाश कवठेकर (वय २३ रा. उमेदनगर, भारत सूतगिरणी ) व अदनान मुल्ला (वय २१ रा. ख्वाँजा काँलनी, मिरज ) या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी एक मोपेड व होंडा कंपनीच्या दुचाकीचीही चोरी केल्याचे कबूल केले. दोघांना अटक करण्यात आली आहे.