सांगली : जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध दहा ठिकाणी घरफोडी करून चोरी करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून ८ लाख ६५ हजाराचे चोरीचे सोन्याचांदीचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी दिली.
निरीक्षक शिंदे यांनी सांगितले, अधिक्षक बसवराज तेली व अप्पर अधिक्षक आंचल दलाल यांच्या आदेशाने विविध पथके घरफोडी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. या पथकातील राजू शिरोळकर याला दोघेजण चोरीचे दागिने विकण्यासाठी उमदी रस्त्यावर वाहनाची प्रतिक्षा करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक संदीप शिंदे व पथकाने किशन उर्फ काप्पा चव्हाण (वय २४ रा. पारधी तांडा, जत) व सुरेश चव्हाण (वय २९ रा. कुंभारी) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> पुणे : प्रेयसीच्या पतीची धमकी; तरुणाची आत्महत्या, पतीसह प्रेयसीविरुद्ध गुन्हा
या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे कंठहार, कर्णफुले, अंगठ्या याच्यासह चांदीचे दागिने मिळाले. दोघांकडे १६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, आणि ४५ हजाराची चांदीचे दागिने, पूजेचे चांदीचे साहित्य, देवाच्या मूर्त्या असा एकूण ८ लाख ६५ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात तीन, जत पोलीस ठाण्यात सहा आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात एक असे दहा घरफोडीचे गुन्हे दाखल असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.