सांगली : हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या १३ वर्षीय नातू वेदांत बंडगर याच्या हत्येप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून फरार असलेला कुख्यात गुंड निलेश गडदे याला अखेर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. कर्नाटक सीमेवर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील पाचपैकी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून अद्याप तीन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
गुरुवारी रात्री अभयनगर मधील जुनी स्टेट बँक कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबारात १२ वर्षीय वेदांत बंडगर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोळ्यात गोळी लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरात संतापाची लाट उसळली होती.
घटनेनंतर मुख्य आरोपी गडदे आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. सांगली पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला निलेश गडदे कर्नाटक सीमेच्या दिशेने लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार हमाल ठेकेदारीतील वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वेदांत बंडगरच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तपासाची गती वाढविली आहे.
