सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना पोलीसांनी वाळवा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्यावर एका संशयितांकडून चार देशी पिस्तुलासह २ लाख ४५ हजाराचा शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी दोघाविरूध्द ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथक पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत गस्त घालत होते. या दरम्यान, पेठ ते नेर्ले या गावच्या महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावरील पेट्रोल पंपालगत एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी बोलावले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून देशी बनावटीची चार पिस्तुले, चार जिवंत काडतुसे व एक मॅगेझीन असा शस्त्र साठा सापडला.
या प्रकरणी साहील मोहन मिसाळ (वय २६ रा. कासेगाव, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली आहे. त्यांने ही हत्यारे कराडमधील एका तरूणाने ठेवण्यासाठी दिली असल्याचे सांगितले. कराडच्या तरूणासह दोघाविरूध्द बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

