सांगली : अल्पसंख्याक समाजाला विश्‍वास देण्याचे काम भाजपच्या मदतीने जनसुराज्य शक्ती करत आहे. लोकसभेची निवडणूक ही गल्लीतील नसून देशाचे भविष्य सुरक्षित कुणाच्या हाती राहील याची दिशा देणारी आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजाने कणखर नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा एकदा देश सोपविण्यासाठी भाजपला साथ द्यावी असे आवाहन जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केले.

सांगलीमध्ये शामरावनगरमध्ये अल्पसंख्याक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील भाजपचे प्रचार प्रमुख प्रभाकर पाटील, ओंकार जाधव, अलीम पठाण, फारुख जमादार, सलीम पठाण, वैभव लाटवडे, रमजान, शाहरुख पठाण तौफिक दड्डी यांच्यासह महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा – साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या : अजित पवार

हेही वाचा – राज ठाकरे सकाळी किती वाजता उठतात? दुपारी उठण्याच्या टीकेवर उत्तर; म्हणाले, “मी रोज… “

इनामदार म्हणाले, शहरातील विस्तारित भागात नागरी सुविधा देण्याचा भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या सहा वर्षात केले आहे. खासदार संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेच्या नागरी प्रश्‍नांची सोडवणूक केली आहे. भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी आहे, अल्पसंख्यांक विरोधी आहे असा अपप्रचार करत लोक तुम्हाला भेटतील. तरुणांमध्ये विष पेरण्याचं काम करतील. अल्पसंख्यांक लोकसंख्या कमी असलेल्या प्रभागातसुद्धा भाजपाचे मुस्लिम नगरसेवक निवडून येतात म्हणजे हिंदू समाज तुमच्या विरोधात नाही हे लक्षात घ्यावे. कुणी कितीही विष पेरण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा मुस्लिम समाज फसव्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.