रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील ‘म्हाताऱ्याचं कोंड’ या परिसरात सोमवारी (२० एप्रिल) विहिरीत पडलेल्या रानगव्याचा वन विभागाने सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी बचाव केला. सायंकाळी या रानगव्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून तो नंतर जंगलाच्या दिशेने निघून गेला.

पोलीस पाटील तुरळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री विष्णू हरडे यांच्या मालकीच्या विहिरीत एक रानगवा पडल्याची माहिती सकाळच्या सुमारास वन विभागाला मिळाली. त्यानंतर परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर-देवरुख यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पाहणीअंती संबंधित विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल आणि अंदाजे १५ बाय २० फूट आकाराची असल्याचे आढळले. त्यात अंदाजे दीड वर्षांचा रानगवा अडकून पडला होता. त्याला बाहेर पडण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने बचावकार्य हाती घेण्यात आले.

वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या एका बाजूने उताराचा मार्ग तयार केला. सुमारे सहा तासांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या या मार्गावरून रानगव्याने स्वतःहून बाहेर पडत जंगलाचा रस्ता धरला.

या बचाव मोहिमेत विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी यांच्यासह वनरक्षक सुरज तेली, आकाश कडुकर, सुप्रिया काळे आणि सहयोग कराडे यांनी सहभाग घेतला. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनीही या मोहिमेत सहकार्य केले.

जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.