रत्नागिरी: संगमेश्वर परिसरात एकाच वेळी पाच जण बेपत्ता झाल्याच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली असून, महिला, वृद्ध आणि तरुणांचा समावेश असलेल्या या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनांची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेबवणे जुवळेवाडी येथील ८० वर्षीय इंदिरा जुवळे या २८ एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्या घराबाहेर फिरत असताना अचानक गायब झाल्या. दुसरीकडे, चिखली पंडववाडी येथील १८ वर्षीय शिवानी म्हादे ही शिवणकाम क्लासला जाते असे सांगून घराबाहेर पडली, मात्र ती परतलेली नाही.
याच परिसरातील धनावडेवाडी येथील २२ वर्षीय अक्षय होडे हा कामानिमित्त बाहेर गेला होता, पण त्याचाही काहीच पत्ता लागलेला नाही. गोळवली कोंडकरडेवाडी येथील ६० वर्षीय नारायण बाचीम हे घराच्या ओट्यावर झोपलेले असताना मध्यरात्री अचानक बेपत्ता झाले. तर राजिवली बौद्धवाडी येथील २२ वर्षीय प्रणाली कदम ही वाडीत जाते असे सांगून घरातून निघाली होती, तीही अद्याप सापडलेली नाही.
या सलग घडलेल्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपासचक्रे वेगाने फिरवली जात आहेत. दरम्यान, या व्यक्तींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. जाधव यांच्याशी ९०११३३९१४७ या क्रमांकावर किंवा संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या ०२३५४-२७२०३३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
