Sangola Panchayat Samiti Election Result : : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. मतदान झाल्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेकांचा दणदणीत विजय झाला आहे, तर काही दिग्गज उमेदवारांना पराभवाला देखील सामोरं जावं लागलं आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोठी चर्चा झाली. कारण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा निकाल जाहीर झाला असून सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूनेचा दणदणीत विजय झाला आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सून राणी पाटील या सांगोला पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. सांगोला पंचायत समितीत राणी पाटील या विजय झाल्या असून त्यांच्या विजयानंतर शहाजीबापू पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचं पाहायला मिळालं. राणी पाटील यांच्या विजयानंतर शहाजीबापू पाटील यांना आनंदाश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पुतण्या आणि सुनेबरोबर विजयोत्सव साजरा केला आहे.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सांगोला पंचायत समितीच्या निकालाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शहाजीबापू पाटील म्हणाले की, “आतापर्यंत चार ठिकाणचे निकाल लागले आहेत. त्यातील तीन ठिकाणी महायुती-आघाडी विजयी झालेली आहे. मात्र, एकूण आपण पाहिलं तर जे मताधिक्य आहे, ते प्रत्येक उमेदवारांचं मताधिक्य सात हजार ते आठ हजार असं आहे. अशा फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून येत आहेत”, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

