सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण बंडखोरी केल्यानंतर मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई असा प्रवास करावा लागला. दरम्यानच्या काळात नेमकं काय-काय घडलं याचे अनेक किस्से शहाजीबापू पाटलांनी सांगितले आहेत. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडखोरी फसली तर काय करायचं? याबाबत चिंता सतावत होती का? असं विचारलं असता पाटील म्हणाले, “व्यक्तीगत पातळीवर मला याची काहीही चिंता नव्हती. पण काही लोकांना चिंता झालीही असावी, अशी शक्यता आहे. मला याबाबत चिंता नव्हती, याचं कारण म्हणजे मी यश-अपयश खूप पचवलं आहे. त्यामुळे मला याचं फारसं कौतुक नाही. मुळात मला आजही आमदार असल्यासारखं वाटत नाही. मी तिथेही तसाच वागलो. पण जे घडत होतं, ते मी बारकाईने पाहिलं. तेव्हा मला जाणवलं येथे आलेला प्रत्येक माणूस कडवा वाटत होता. डगमगत नव्हता. आपसात गप्पा मारताना देखील आमदारकी गेली तर जाऊ दे, असा विचार ते करत होते,” असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, “ज्यावेळी आपण युद्धाला जातो, तेव्हा घरी काय चाललंय? हे बघून चालत नाही. ही लोकशाहीची लढाई आहे. त्यामुळे आपण पडलो तरी घराकडे जातोय आणि झुकलो तरी घराकडे जातोय. पण आधीच्या काळात मावळे लढाई करायला जायचे, तेव्हा त्यांना बायका ओवाळायच्या, टीळा लावायच्या. तेव्हा परत येण्याची हमी नव्हती. पण बायका म्हणायच्या मर पण पराजित होऊन येऊ नको. आम्हीही असंच गेलो. मरायचं पण हरायचं नाही, जिंकूनच यायचं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही जिंकून आलो.” असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- “पराभूत झाल्यानंतर घरी गेलो की बायको म्हणायची याला…”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

बंडखोरी फसली तर प्लॅन बी होता का? या प्रश्नाला उत्तर देताना शहाजीबापू म्हणाले, “मी काही नेता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. पण ज्या गतीने हे सर्व घडत गेलं. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी कसा गोल केला, हे कुणालाच कळलं नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangola rebel mla shahajibapu patil plan b exposed inside story eknath shinde latest update rmm
First published on: 06-07-2022 at 19:25 IST