Dr. Sangram Patil files petition in Mumbai High Court against Mumbai Police Look Out Circular and charges: “मी सध्या कुठे आहे? भारतात की इंग्लंडला परतलो?” अशा चर्चांना पूर्णविराम देत प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी स्वतःच आपली सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या लूक आऊट सर्कुलरमुळे (LOC) आपण गेल्या दोन महिन्यांपासून भारतातच अडकलो असून, हे सर्कुलर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
१० जानेवारीपासून भारतातच मुक्काम
डॉ. संग्राम पाटील यांनी समाजमाध्यमाद्वारे आपल्या मित्र आणि हितचिंतकांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, ते १० जानेवारी २०२६ पासून भारतातच आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात ‘लूक आऊट सर्कुलर’ जारी केल्यामुळे त्यांना त्यांच्या घरी म्हणजेच युकेला (UK) परत जाता आलेले नाही.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
- या प्रकरणी डॉ. पाटील यांनी २० जानेवारी २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई आणि लावलेली कलमे अयोग्य आहेत.
- संबंधित गुन्हा रद्द करण्यात यावा.
- परदेश प्रवासावर बंदी घालणारे ‘लूक आऊट सर्कुलर’ त्वरित रद्द करावे.
न्यायालयातील सद्यस्थिती
सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू असून डॉ. पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. पाटील यांनी स्वतःचे प्रतिज्ञापत्र सादर करून आपले म्हणणे सविस्तरपणे आणि मुद्देसूदपणे लिखित स्वरूपात मांडले आहे. “मला न्याय मिळावा यासाठी मी न्यायालयाकडे विनंती केली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
१५ एप्रिलकडे लक्ष
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी न्यायालयाकडून सकारात्मक निकाल मिळेल, अशी आशा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. “संविधान आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. “माझ्यावर लावलेली कलमे अयोग्य असून मला न्याय मिळेल अशी आशा आहे”, असंही पाटील म्हणाले.
