लोकसत्ता विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
शिवसेना-ठाकरे गटाचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री व शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटातील खासदारांच्या कथित बंडाची चर्चा तीव्र झाली आहे.
खासदार संजय देशमुख हे रविवारी मुंबईमध्ये ह्य्मातोश्रीह्णवर शिवसेना-ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. ते ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीला ठाकरे गटातील ५ खासदार गैरहजर राहिल्याचे सांगितले जाते. मात्र, या बैठकीच्या दुसर्याच दिवशी, सोमवारी खासदार संजय देशमुख दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सरकारी निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या गाठीभेटीनंतर ठाकरे गटातील खासदारांमध्ये पुन्हा फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही मंगळवारी दिल्लीत येणार आहेत. राऊत कदाचित लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. या घडामोडींमुळे शिवसेना-शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरला गती दिली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीत भेट घेतल्याची कबुली खासदार संजय देशमुख यांनी दिली. माझ्या कामासाठी दिल्लीला गेलो होते, त्यावेळी मी प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. मी जाधवांना उघडपणे भेटलो आहे. ही भेट लपून-छपून घेतलेली नाही. त्यामुळे या भेटीतून कोणीही वेगळा अर्थ काढू नये, असे देशमुख यांनी सांगितले.
ठाकरेही फडणवीस यांना भेटले
आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकांचे विरोधक असलो तरी संबंध चांगले आहेत. खासदार संजय देशमुख व मी मैत्रीचे संबंध जपले आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गेले आहेत, असेही जाधव म्हणाले.
कोणते खासदार गैरहजर?
उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊनच मी बैठकीत सहभागी झालो. त्यांनीच मला मुंबईला आला नाहीत तरी चालेल असे सांगितले, असा दावा देशमुख यांनी केला. ठाकरे गटात मी नाराज नाही, आम्ही दुसर्या पक्षात जाणार नाही, असाही दावा देशमुख यांनी केला. ठाकरे यांच्या बैठकीला देशमुख यांच्यासह संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (धाराशीव), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) हे देखील गैरहजर होते.
कारवाईची धास्ती
शिवसेनेचे नऊ पैकी सात खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या १९ जून रोजी होणार्या वर्धापनदिनी काही तरी नक्कीच वेगळे घडेल, असे संकेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. शिवसेनेचे एकूण नऊ खासदार असून, पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला तरच त्यांची खासदारकी वाचू शकेल.
सत्तेच्या हव्यासापोटी आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी विरोधी पक्ष फोडणे, चिन्हे आणि नावे चोरणे हा भारतीय जनता पक्षाचा गलिच्छ डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाबरोबर असणार्यांवर नेहमीच विश्वास दाखविला आहे. जे मशालीच्या चिन्हावर आणि जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. -आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
