शिवसेना (ठाकरे) पक्षातून फुटून काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज (२५ जून) पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भातील संजय दिना पाटील यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर आता खासदार संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये जो काही प्रकार झाला, त्याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे’, अशा शब्दांत खासदार संजय दिना पाटील यांनी माफी मागितली आहे. या संदर्भात संजय दिना पाटील यांनी एक्सवर (ट्विटर) व्हिडीओ शेअर केला आहे.

खासदार संजय दिना पाटील काय म्हणाले?

“पत्रकार आणि माझ्यामध्ये जो प्रकार घडला, त्याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हा प्रकार नेमकं का घडला? याबाबतही सांगतो. ज्या दिवसापासून मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्या दिवसापासून अतिशय वाईट शब्दांत आणि शिवीगाळ करून माझा अपमान केला गेला. तरीही मी सर्व अपमान सहन केला. त्यानंतर आज सकाळी माझे काही पत्रकार मित्र आले, तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली की मला याबाबत काहीही विचारू नका. मला जे बोलायचं होतं, ते बोलून झालं आहे. आता मला कृपा करून काही विचारू नका. मी त्यांना हात जोडून विनंती केली. मला आणि माझ्या परिवाराला जे शिव्या देत आहेत, त्यांना लांब ठेवा, असं मी पत्रकारांना सांगितलं. मात्र, तरीही पत्रकार मला त्याच गोष्टीवर विचारण्यासाठी आले होते. तेव्हा माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये काही वाद झाला. त्यामध्ये माझ्याकडून चुकीने काही अपशब्द निघाले, त्यासाठी मी त्या सर्व पत्रकारांची आणि पत्रकार समुहाची दिलगिरी व्यक्त करतो”, अशा शब्दांत संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे.

संजय दिना पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं?

संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं होतं की, “रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली होती?

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी प्रवासात असल्यामुळे मला या प्रकरणाची काही माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊनच त्यावर बोलणं योग्य होईल. नेमकं काय घडलं? याची माहिती मी घेतो. मात्र, कोणालाही कोणीही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही.”

शिंदेंकडून संजय दिना पाटलांना दिलगिरीचा सल्ला

“मी आताच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी कोणतीही भावना नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं संजय दिना पाटील यांनी मला सांगितलं. पत्रकारांच्या बाबतीत संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये कुठलाही राग नव्हता. पत्रकारांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जर पत्रकारांना काही शब्द गेले असतील तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी”, असं स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.