गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे) पक्षामधून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी एक असलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी थेट विधानसभेत याबाबत प्रश्न विचारले आहेत.

संजय दिना पाटील काय म्हणाले?

“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आलात तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मी या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो आणि पुन्हा बोलतो. मात्र, मी आताच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी कोणतीही भावना नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं मला संजय दिना पाटील यांनी सांगितलं”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

“जे दररोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्याबाबत अपशब्द बोलतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवा, अशा पद्धतीने खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, मग तो देखील मीडियाचा अपमान आहे. किती दिवसांपासून काय-काय बोलतात ते आपण पाहिलं आहे. याचाच राग संजय दिना पाटील यांच्या मानामध्ये आहे. मात्र, पत्रकारांच्या बाबतीत संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये कुठलाही राग नव्हता. पत्रकारांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जर पत्रकारांना काही शब्द गेले असतील तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“ते सहा खासदार मिंधेंच्या टोळीत गेलेले आहेत. आता मी ऐकलं की एका पळकुट्या खासदाराने सर्वांनाच धमकी देणं सुरू केलंय. ते आता स्वप्नात पण धमकी देत असतील. मला हे सांगा की त्या खासदाराने धमकी कधी दिली? सकाळी दिली की रात्री दिली? म्हणजे जे दुसऱ्या कोणत्या मूडमधून बाहेर आले नसतील. मला वाटतं की हे सगळं भारतीय जनता पक्षाचे नेते पाहत आहेत की नाही? हे पंतप्रधान पाहत आहेत की नाही? मुद्दा हाच आहे की, जे पळालेले लोक आहेत, त्यांना जनतेचे प्रश्न नको झालेले आहेत. त्यांना बाकी काहीही दिसत नाही. फक्त स्वत:चा पैसा वाढणार कसा, एवढीच त्यांना काळजी आहे”, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्यावर टीका केली.