Sanjay Dina Patil rebellion, daughter Rajul Patil rushed to Matoshree : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंपाचे तीव्र हादरे बसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून, पक्षाचे ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी थेट ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि आपण पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
“मी ठाकरेंसोबतच…” राजुल पाटील यांनी दिले वचन
‘मातोश्री’वरून बाहेर पडल्यानंतर राजुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपल्या भूमिकेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “मी उद्धव आणि आदित्य ठाकरेंना भेटायला आले होते. मी त्यांच्यासमोर माझी भूमिका स्पष्ट केली असून मी त्यांच्यासोबतच आहे. हा माझा निर्णय आहे. मी माझं कार्य नीट निष्ठेने पार पाडेन.”
दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात राजुल पाटील यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी असेल, असे विचारले असता त्या म्हणाल्या, “मी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. माझ्या या निर्णयावर आणि भूमिकेवर उद्धव ठाकरे अत्यंत समाधानी आणि खूश आहेत.”
वडिलांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
खासदार संजय दिना पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीवर भाष्य करताना राजुल पाटील यांनी कौटुंबिक आणि राजकीय भूमिका वेगळी असल्याचे दाखवून दिले. त्या म्हणाल्या, “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आमच्या घरात प्रत्येकाला आपापले राजकीय निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा अंतिम निर्णय काय आहे, ते स्वतःच जाहीर करतील.”
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजुल पाटील गैरहजर होत्या. या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मात्र, वर्धापन दिनी त्यांनी फेसबूक पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या.
या शुभेच्छांच्या पोस्टवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र होते. तर, मशाल हे पक्षचिन्हही होते. त्यामुळे त्या पक्षाबरोबरच राहणार असल्याचे संकेत मिळाले होते. आज त्यांच्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
