शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत. यानंतर आता संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. एवढंच नाही तर संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत.
या घडामोडीनंतर अखेर आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून अखेर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी आज (३० ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधताना दिलं आहे.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?
“सध्या सोशल मीडियावर आणि मीडियांमध्येही मी शेतकऱ्यांबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत काहीतरी चुकीचं बोललो अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, मी जे बोललो त्यामध्ये मी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. तुम्ही माझा बाईट परत पाहू शकता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे”, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
‘…तर मी दिलगिरी व्यक्त करतो’; संजय गायकवाड
“गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी माझा संघर्ष सुरू आहे. मी देखील शेतकरी आहे. माझे वडीलही शेती करायचे. मी अनेकदा शेतकऱ्यांना मदत देखील केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल मी कधीही वाईट बोलू शकत नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबात देखील एक आत्महत्या झाली. माझं वक्तव्य हे अमली पदार्थांचं सेवन करून आपला संसार उघड्यावर टाकणाऱ्या किंवा आत्महत्या करणाऱ्या लोकांविषयी होतं. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागितली आहे.
संजय गायकवाड यांनी काय वक्तव्य केलं होतं?
आमदार संजय गायकवाड यांनी काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये. आपली अर्धांगिनी, मुलांना वाऱ्यावर सोडून हे शेतकरी आत्महत्या करतात. बायकोसोबत सात जन्माची शपथ घेतात, सात फेरे घेतात. मात्र आत्महत्या करतात. त्यामुळे यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.
