scorecardresearch

“या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून मारेल”, संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाडोत्री लोकांच्या…”

शिंदे गट आणि भाजपात काही लफंगे असून २०२४ मध्ये जनता त्यांना रस्त्यावरून येऊन मारेल, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.

sanjay gaikwad replied to sanjay raut
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि सदानंद कदम यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली होती. शिंदे गट आणि भाजपात काही लफंगे असून २०२४ मध्ये जनता त्यांना रस्त्यावरून येऊन मारेल, असं म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तर आम्ही न्यायालयात दाद मागू”; आशिष देशमुखांचा थेट मल्लिकार्जुन खरगेंना इशारा!

काय म्हणाले संजय गायकवाड?

“संजय राऊत पिसाळलेली औलाद आहे. आम्ही त्याला काही फारसं महत्त्व देत नाही. आमच्या आमदार खासदारांना मारणारा अजून या महाराष्ट्रात पैदा झाला नाही. ज्याचे हात आमच्या आमदार खासदारांवर पडेल, त्याचा हात तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यामुळे भाडोत्री लोकांच्या जोरावर संजय राऊतने अशी भाषा वापरू नये”, असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी दिलं आहे.

संजय राऊतांनी फक्त सुरक्षा सोडून बाहेर यावं

“आम्हीसुद्धा बाळासाहेबांचे सैनिक आहोत. हे संजय राऊतने लक्षात ठेवावं. शिवसेना भाजपाच्या लोकांना लफंगे म्हणणाऱ्या राऊतला आठ-दहा दिवसातच कळेल की त्याने जो चोर शब्द वापरला त्याची त्याला काय शिक्षा मिळते. त्याने फक्त सुरक्षा सोडून बाहेर यावं, मग लफंगे काय असतं, हे आम्ही त्याला दाखवू” असा इशाराही त्यांनी दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कपिल शर्माप्रमाणे हास्यकलाकार..” किरीट सोमय्यांनी उडवली खिल्ली

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि सदानंद कदम यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजपा-शिवेसना सरकारवर जोरदार टीका केली होती. “भाजपा-शिंदे गटात काही लफंगे आहेत. या लफंग्यांना २०२४ नंतर जनता रस्त्यावर पकडून मारेल. लिबीया, इराण यासारख्या काही देशांमध्ये अशा हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकांना जनतेने रस्त्यावर मारले आहे”, असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 16:47 IST