मुंबई: सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली.

गायकवाड यांनी आंबी यांना अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून सरकारने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्या झाल्या असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकार कारवाईस का घाबरते – हर्षवर्धन सपकाळ

प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आमदार संजय गायकवाड हे सातत्याने दादागिरी व गुंडगिरी करत असतात. आमदार कॅटिंनमध्ये कामगारांना मारहाण करणे, बुलढाण्यात वाळू तस्करी, जबरदस्तीने जमीन बळकावणे, कोणालाही अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ करणे, ही त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरूच असताना मुख्यमंत्री मात्र या आमदाराला पाठीशी घालत आहेत, असे सपकाळ म्हणाले.