Sanjay Kakde Sharad Pawar Letter: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केल्याने काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात घुसून निदर्शन करत दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर याप्रकरणी जोरदार टीका केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना पत्र लिहले आहे. शरद पवारांचा महिलांबद्दलचा आदर कुठे गेला? असा सवाल काकडेंनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या टीकेनंतर राजकारण तापले
बीड मधील पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ प्रसिद्ध करत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया असे म्हणत टीका केली. या पत्रकार परिषदेत बीड मधील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला धनंजय मुंडे गप्प करताना दिसत आहेत. यावरुनच काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर टीका केली. यावरुन राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली असून, काँग्रेसकडून माफीची मागणी केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पत्रकार परिषद घेत ‘गुंगी गुडिया’ ही शिवी नाही अथवा अपशब्द नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सपकाळांनी काँग्रेसने केलेल्या टीकेचे समर्थन केले. सुनेत्रा पवारांनी कतृत्वातून आरोप खोडून काढवेत त्यानंतर महाराष्ट्र त्यांना दुर्गा म्हणून ओळखेल, असेही सपकाळ म्हणाले.
संजय काकडेंचा इशारा
याप्रकरणावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय काकडे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना पत्र लिहले असल्याचे ,सांगितले आहे. “आम्ही २४ तास वाट पाहू, अॅक्शन झाली नाही तर आमचे कार्यकर्ते त्यांना सरळ करतील”, असे म्हणत काकडेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा दिला आहे. “शरद पवारांना महिलांबाबत असलेला आदर कुठे गेलाय? त्यात त्यांच्या सुनेबद्दलचा आदर कुठे गेलाय? हे माझ्या लक्षात येत नाही”, असे काकडे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, या वादानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, “काँग्रेसच्या पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे”, अशा शब्दात भूमिका स्पष्ट केली. तर, राष्ट्रावादीने या टीकेकडे सकारात्मकपणे पाहण्याची गरज सपकाळांनी व्यक्त केली. “याबाबत गोंधळ घालण्याची अथवा शहाणपण शिकवण्याची गरज नाही. इंदिरा गांंधींना देखील गुंगी गुडिया म्हणून हिणवण्यात आले पण त्यांनी त्यांच्या कतृत्वातून त्या गुंगी गुडिया नसल्याचे सिद्ध केलं आणि वाजपेयींना देखील त्यांचे दुर्गा म्हणून कौतुक करावं लागलं. सुनेत्रा पवारांवर आम्ही गुंगी गुडिया म्हणून टीका केली असेल तर, त्यांनी दुर्गा आहे असं सिद्ध करावं”, असे आव्हानचं सपकाळांनी दिले.
