छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख या शस्त्राचा वापर करून हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाहाचा सरदार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शस्त्र सध्या इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात असून ते महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. वास्तूसंग्रहालयाशी करार करून वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून माजी मंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की फक्त शिवकालीन आहेत? याबाबत राज्य सरकारने खुलासा करावा. तसेच ही वाघनखं किती वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली जात आहेत? याबाबतही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या मागणीला शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी उत्तर दिलं आहे. हे ही वाचा >> “महाराष्ट्रात नको असलेल्या नेत्यांना…”, लोकसभा निवडणुकीच्या भाजपाच्या योजनेवरून जयंत पाटलांचा टोला संजय मंडलिक यांनी काही वेळापूर्वी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी खासदार मंडलिक म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृतीचिन्हं आपल्या देशात आल्यावर शिवप्रेमींना आनंदच होणार आहे. त्यामध्ये वाघनखं असतील, महाराजांची तलवार असेल अशा महाराजांच्या आठवणी इथे आणल्यावर आम्ही त्याचं स्वागतच करू". यावेळी मंडलिक यांना आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारल्यावर ते म्हणाले, मला त्या वादात पडायचं नाही. कदाचित आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं ही वाघनखं वाटत असतील, मला त्याची माहिती नाही.