परमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने भूमिका घेणे आवश्यक, संजय निरुपम यांचे मत

शिवसेनेचे माजी नेते संजय निरुपम २००५ साली कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

माजी खासदार संजय निरुपम यांनी सांगितले की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या दाव्यावर काँग्रेसने आपली भूमिका मांडणे आवश्यक आहे. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे की, पोलिस अधिकाऱ्यांनी बार आणि हॉटेलमधून दरमहा १०० कोटी रुपये जमा करावेत असा आदेश दिला होता.

“जर परमवीरसिंग जे काही सांगत आहेत ते खरं असेल तर माननीय शरद पवार जी यांनी प्रश्न विचारला पाहिजे कारण ते सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी शेवटी काय करणार आहे ? काँग्रेसने या विषयावर आपली भूमिका मांडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश असलेले महा विकास आघाडीचे राज्य सरकार आयपीएस अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रामुळे हादरलेले असताना संजय निरुपम ह्यांनी हे मत मांडले. शिवसेनेचे माजी नेते निरुपम २००५ मध्ये काँग्रेसमध्ये  दाखल झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या आठ पानांच्या पत्रात सिंग यांनी आरोप केले की देशमुख पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून बार, रेस्टॉरंट्स व इतर आस्थापनांकडून पैसे गोळा करण्याचे लक्ष्य देत असत.

रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या पत्रकात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, सिंग यांच्या ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर त्यांची सही नव्हती तसेच ते पत्र अधिकृत ईमेल आयडीवरून पाठविलेले नाही आणि ते पडताळण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंग यांनी नंतर हे उघड केले की त्यांनीच हे पत्र ईमेलद्वारे पाठवले आहे, ज्याची स्वाक्षरी असलेली एक प्रत लवकरच सरकारकडे पाठवली जाईल.

आयपीएस अधिकाऱ्याने दावा केला आहे की, मंत्री यांनी वाझे यांना सांगितले की, त्यांनी महिन्यातून १०० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी निम्मे पैसे हे जवळपास १७५० बार, रेस्टॉरंट्स आणि शहरातील अशा प्रकारच्या आस्थापनांमधून जमा केले जावे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रीपद देशमुख यांच्याकडून काढून घेण्याबद्दलचा विचार केलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay nirupam says congress must take stand on claim by param bir singh sbi