राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाच्या संयुक्त सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांचा देखील समावेश आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील काही नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशीनंतर मला पोलिसांकडून क्लीनचिट मिळाली आहे. असे असताना कोणी माझ्यावर टीका केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो, असा इशारा संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

“पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हा त्यामागचा हेतू होता” असे राठोड म्हणाले. या प्रकरणामुळे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही राठोड यांनी केला आहे. दरम्यान, मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले, असे राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरण समोर आल्यानंतर गेल्या १५ महिन्यांपासून माझ्यासह संपूर्ण कुटुंब तणावाखाली वावरत असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. या प्रकरणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिका पुणे न्यायालयाने फेटाळून लावल्याचेही राठोड यांनी यावेळी सांगितले.

“ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

दरम्यान, राठोड यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करत राठोडांना क्लीनचिट का दिली? असा सवाल त्यांनी केला आहे. पीडित मुलीला न्याय मिळणार असेल, तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तर दुसरीकडे मलीन प्रतिमा असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे.