नांदेड ःकेंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरी, कष्टकर्यांच्या विरोधात असून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारला आता गाडून टाकण्याची वेळ आली आहे. मुक्तिसंग्रामाचा मोठा इतिहास असलेल्या मराठवाड्यातून या जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचा वणवा आता महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी येथे व्यक्त केला.
शिवसेना नेते व माजी विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून ‘तुम से ना हो पाएगा’ या उपहासात्मक शीर्षकाखाली मराठवाड्यात सुरु असलेल्या जनआंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी खा.राऊत आणि आ.दानवे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना खा.राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विनाअट सरसकट शेतकर्यांची कर्जमाफी केली; परंतु फडणवीस यांनी कर्जमाफी तर केलीच नाही, शिवाय विविध निकष आणि अटी-शर्थी लादून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली.’
सत्ताधार्यांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे, मराठवाड्यातील मातीशी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली असून त्यामुळेच या सरकारला याच मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे नमूद करून मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना, भारतीय जनता पक्षात गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन नरेंद्र मोदी यांच्याकडे का गेले नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला.
भाजपारुपी रझाकार सरकार – दानवे
मराठवाडा रझाकाराच्या गुलामी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यविरांचे रक्त सांडले. शेवटी रझाकारी राजवट संपुष्टात आली, परंतु हे सरकार रझाकारापेक्षाही जुलमी सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट असून लेंडी, ऊर्ध्व पैनगंगा, बाभळीसह अनेक सिंचन प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या आंदोलनात आ.राहुल पाटील, आ.प्रवीण स्वामी, माजी आ.अनसूया खेडकर, संपर्क प्रमुख बबन थोरात, जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, बबन बारसे, भुजंग पाटील, धोंडू पाटील, प्रकाश मारावार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाऊस नाही, शेतातील पिकांनी माना टाकल्या आहेत. लोडशेंडींग सुरु आहे. शेतकर्यांना विजेसाठी टाहो फोडावा लागतो. गतवर्षी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. हेक्टरी साडेसतरा हजार रुपये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली. खरडून गेलेल्या जमीनीचे ३ लाख ४६ हजार रुपये मिळतील, अशीही घोषणा फडणवीस सरकारने केली. परंतु या सर्व घोषणा फसव्या ठरल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा लढा आता शिवसेनेने हाती घेतला आहे, आता लढावेच लागेल, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
