scorecardresearch

“मांडीवर घेतलेल्या बेईमान जनाबांना सांभाळा”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात बॅनर लागले आहेत. यापैकी काही बॅनर उर्दू भाषेत आहेत. त्यावरून ठाकरे यांच्यावर भाजपाकडून टीका होत आहे.

sanjay raut devendra fadnavis
उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील बॅनरवरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती.

मालेगावात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा होणार आहे. या सभेपूर्वी मालेगावात ठाकरे गटाकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही उर्दू बॅनरदेखील आहेत. हे बॅनर पाहून एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर टीका सुरू आहे. या बॅनरबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अली जनाब हे उद्धव ठाकरेंना शोभतं का? या लांगुलचालनाचं बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल.”

फडणवीसांच्या टीकेला आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर आलं आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना बोलण्यापूर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात त्या जनाबांना आधी सांभाळा.” राऊत म्हणाले, “बाळासाहेबांचं आमच्यावर बारीक लक्ष आहे. आम्ही जे काम करत आहोत ते त्यांच्या प्रेरणेनेच करत आहोत.”

संजय राऊत म्हणाले की, “मुस्लीम मतदारांवरून भाजपा बोलतेय पण त्यांना मुस्लिमांची मतं नको असतात का? मुस्लीम लोकही इथले नागरिक आहेत, तेही इथले मतदार आहेत. देशात २२ कोटी मुस्लीम नागरिक आहेत. त्यांच्याविषयी अशी वक्तव्ये करणं म्हणजे फाळणीची बीजं रोवण्यासारखं आहे.”

हे ही वाचा >> “भर सभेत लिपस्टिकचा विषय”, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नाशकातल्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू बॅनर पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन जर उद्धव ठाकरे त्यांचं लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या