विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकावर निशाणा साधला. राणा दांपत्याने हनुमान चालिसा पठणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन गोंधळ झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रात हनुमान चालीसाचे पठण केल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह प्रत्येक भाजपा कार्यकर्ता हनुमान चालीसाचे पठण करेल, हिंमत असेल तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. तसेच हनुमान चालिसा पठण करणं कायद्याविरोधात आहे का?, असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला. याच प्रश्नावर आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर दिलंय.
भाजपाच्या पत्रकार परिषदेमधील फडणवीसांचा फोटो ट्विट करत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. “भाजपा नेत्यांनी विचारलं आहे की, हनुमान चालिसा म्हणणं हे महाराष्ट्रामध्ये कायद्याविरोधात आहे का? तर नाही सर, नक्कीच नाही. मात्र हनुमानाचा वापर राजकारणासाठी करणे आणि त्याच्या नावाखाली हिंसेसाठी लोकांना प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. चालिसा ही मंदिरांमध्ये किंवा देवासमोर म्हटली जाते. रस्त्यावर तिचं पठण करणं हे धर्माच्याविरोधात आहे. हा राजद्रोह नाही तर ही भाजपाकडून केली जाणारी ईश्वनिंदा आहे,” असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यापुढे हनुमान चालीसाचे पठण करण्याचे जाहीर केल्याने देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा प्रश्न देखील या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी उपस्थित केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असताना पोलिसांनीच त्यांना पोलीस ठाण्याबाहेरील शिवसेना कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले. सरकारच्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. जशास जसे उत्तर देण्याची भाजपची ताकद आहे. केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांनी हत्या केली होती. महाराष्ट्रात तर भाजपचे चांगलेच बळ आहे. त्यामुळे आता सरकारशी जोरदार संघर्ष केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भोंग्यांबद्दलही स्पष्टच बोलले…
मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी मनसे व भाजपने केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यावर बहिष्कार घातल्याचे जाहीर करून पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदूधर्मीयांनी नवरात्री, गणेशोत्सवासह अन्य सण व कार्यक्रमांमध्ये याबाबतच्या अटी व निर्बंधांचे पालन केले आहे, तसे आता मुस्लीमधर्मीयांनीही करावे.