२८ जानेवारीला अजित पवारांचं अपघाती निधन झालं. मात्र या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अजूनही उमटत आहेत. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी, तसंच अजित पवारांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त होते आहे. आज संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. तसंच विलीनीकरणाच्या चर्चांवरही काही वक्तव्यं समोर आली आहेत. जाणून घेऊ दिवसभरातली पाच महत्त्वाची वक्तव्यं.

संजय राऊत अजित पवारांच्या मृत्यूविषयी साशंक

अजित पवार याच्या विमान दुर्घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या अरोपांचा उल्लेख केला. “अजित पवारांनी स्वगृही परत जाणे हा भाजपाचा पराभव होता. देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला असता आणि भाजपाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार जे वारंवार सांगत होते की माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्यांची फाईल आहे आणि मी उघड करेन. हे त्यांनी १५ जानेवारीला सांगितले आणि पुढच्या १० दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे, हे रहस्यमय आहे. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोया यांच्या त्या प्रकरणाची आठवण झाली. मी कोणावर आरोप करत नाही पण या लोकांच्या मनातील शंका आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार का? सुनील तटकरे काय म्हणाले?

विलिनीकरण होणार की नाही? या प्रश्नावर सुनील तटकरेंनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही, पण त्याचवेळी निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे, असा सूचक उल्लेख मात्र त्यांनी केला. “आम्ही एनडीएमध्ये भाजपासोबत केंद्रात, राज्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत आहोत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका आम्ही घेतली. ती पुढे नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आता या विचारांशी सुसंगत म्हणजेच भाजपाप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भातली भूमिका ज्यांना सोबत यायचंय त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. असं तटकरेंनी म्हटलं आहे.

विलीनीकरणाच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“अजित पवार मला म्हणाले होते की जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सर्वकाही ठीक होईल. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण होतं. आता यावर लोकांना काय चर्चा करायची आहे ते करूद्यात.या चर्चेपासून मी मुद्दाम लांब राहिलो आहे, मला वाद नकोय. या वादात जाण्यात काहीही अर्थ नाही. एक माणूस गेल्यावर तो काय बोलला होता, बोलला होता की नाही. ही चर्चा करणे म्हणजे नैतिकतेला धरुन नाही. मी गेले काही दिवस गप्प आहे. त्याला काही कारणं आहेत. त्यामुळे माझा बाप (शरद पवार) जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मला काय वाटतं ते मी माझ्या मनातच ठेवीन, ते मी बाहेर काढणार नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवारांच्या विमान अपघाबाबत विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

अजित पवार यांच्या विमान अपघातावर ८० टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर हा घातपात असल्याचे बोललं जात आहे. ज्या पायलटचं नाव समोर आलं तो आता जिवंत असल्याचं सांगितलं जातं. ऐनवेळी पायलट का बदलला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘दाल मे कुछ काला है! त्यामुळे या अपघाताची नि:पक्ष चौकशी व्हायला हवी’, असे मत वडेट्टीवार यांनी मांडले.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा देणार नाही-राज ठाकरे

मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून भाजपा आणि शिंदेसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर स्वतःचा महापौर बसवण्याकरता सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाबरोबर जाण्यास तयार असल्याचीही चर्चा यानिमित्ताने होत होती. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.मुंबईतील एमआयजी क्लब येथे मनसेच आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खुद्द राज ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबई महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “हे मी स्वतः सांगतोय, भाजपाला पाठिंबा देणार नाही” असं म्हणत राज ठाकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.