Sanjay Raut Attacks Amit Shah: उबाठा गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर बोचरी टीका केली आहे. “तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा”, अशी टीका राऊतांनी केली. अमित शाह लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आज पुण्यात आहेत. शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. यावरुन राऊतांना शाहांना कोणाला घाबरताय? असा सवाल केला. राऊतांनी यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कारावरुनही टिळकांच्या वशंजांवर टीका केली.
अमित शाह संसदेत आले नाहीत – राऊत
“रात्रीच्या अंधारात देशाचे गृहमंत्री पुण्यात उतरले. त्यांचे हात या देशातील विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. गेल्या १० दिवसांच्या अधिवेशन काळात गृहमंत्री संसदेत आले नाहीत, पेपरफुटीवर चर्चा सुरु आहे, त्या गैरप्रकाराला गृहखातं जबाबदार आहे. न्याय मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला, पॅलेट गन चालविण्यात आली आणि या विषयावर संसदेत चर्चा आली तेव्हा गृहमंत्री पळून गेले”, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.
२०२९ पूर्वी मोदी – शाह सत्तेत नसतील राऊतांचा दावा
“वंदे मातरम संबधित विधेयक संसदेत आलं त्यावेळी पंतप्रधान आणि गृहमंत्री आले नाहीत, ते कुठे असतात, काय कांड करत असतात?”, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी रात्री बारा वाजता व्हिडीओ टाकतात, त्यांनी हिंसेच्या गप्पा मारु नयेत, जंतर मंतरवर लाखो मुलांनी तुम्हाला नमवलं, गुडघ्यावर आणलं. २०२९ मध्ये मोदी – शाह सत्तेवर नसतील, त्यापूर्वीच यांचा बाजार उठलेला असेल, असा दावाही राऊतांनी केला. लोकमान्य टिळकांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कावरुनही राऊतांनी टिळक कुटुंबीयांवर टीका केली.
शिंदेसेनेत टिळकांच्या प्रवेशावरुन राऊतांची टीका
“काय झालंय टिळक कुटुंबीयांना? कोणीतरी शिंदे गटात गेले आहे. टिळकांचे वंशज शिंदे गटात? लाज वाटली पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे म्हणणारे, ज्यांचे पूर्वज छातीचा कोट करुन ब्रिटिशांशी लढले, मंडालेच्या तुरुंगात गेले. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा कडक शब्दात धिक्कार केला, त्यांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातोय आणि ज्यांच्या हस्ते दिला जातोय त्यांनी जंतर मंतर कांड केले”, असा आरोप राऊतांनी केला. “जालियनवाला बाग नंतर देशात जंतर मंतर कांड झाले, जनरल डायरनंतर जनरल कायर, अमित शाह”, अशी टीका राऊतांनी केली.
“तुम्ही तडीपार गुंड आहात” – शाहांवर बोचरी टीका
यात राजकारण नाही, हा देशाच्या अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय आहे. जे आम्ही लोकमान्य टिळकांकडून शिकलो, असे राऊत पुढे म्हणाले. पुण्यात लष्कर आणि पोलिस दल गोळा केल्याचे म्हणत कशाला घाबरताय, गृहमंत्रा आहात ना? मुळात तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा. तुम्ही तडीपार गुंड आहात, मग गुंडाने गुंडासारखे वागावे किंवा गृहमंत्र्याने गृहमंत्र्यासारखे वागावे. जनतेशी संवाद साधा, बोला त्यांच्याशी. आम्हाला लोक गुंड म्हणतात आम्ही गुंडासारखे वागतो, सत्तेत आल्यावर सत्ताधाऱ्यांसारखे वागू”, असेही राऊत शाहांवर टीका करताना म्हणाले.
