Sanjay Raut Aurangzeb Statement : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी करीत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या या विधानावर भाजपाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यावरून मोठा राजकीय वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशाने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांसारखे महान नेते घडवले. या देशाच्या मातीने अशा महान नेत्यांना जन्म दिला आहे, पण नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि कार्यपद्धती पाहिल्यानंतर मला चिंता वाटते. कारण- ज्या भूमीने औरंगजेबाला जन्म दिला, त्याच भूमीने मोदींनाही जन्म दिला आहे. औरंगजेबाचाही जन्म गुजरातमध्ये झाला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही केली होती औरंजेबाशी तुलना
संजय राऊत हे ठाकरे गटाचे आक्रमक नेते मानले जातात. २०२४ मध्येही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतरच्या काही दिवसांतच छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात राऊत यांनी मोदींना गब्बर अशी उपमा दिली होती. इतक्यावरच न थांबता त्यांनी आपल्या देशाला एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान लाभला आहे. खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदी यांना सुवर्णपदक मिळेल. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास आपण ही स्पर्धा आयोजित करून त्यात मोदींना सहभागी करून घेऊ म्हणजे ते खोटे बोलण्यातले सुवर्ण पदक जिंकतील, असेही राऊत म्हणाले होते. त्यावरूनही राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता.
ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. संजय राऊत यांनी खासदार फुटण्याच्या वृत्ताचे खंडन केले असले तरी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता. तेव्हापासून पक्षातील काही आमदार आणि खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अलीकडील काही घडामोडीनंतर चर्चांना आणखीनच बळकटी मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांत उपमुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरे गटाच्या काही खासदारांबरोबर बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे सध्या लोकसभेत नऊ खासदार आहेत. त्यापैकी तब्बल सात खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अर्थातच शिंदेसेना आणि ठाकरे गटातील नेत्यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जर ठाकरेंचे खासदार फुटलेच तर त्यांना पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. जर अशी कोणतीही राजकीय घडामोड घडल्यास संबंधित खासदारांचा सर्वाधिक संभाव्य पर्याय म्हणजे हा शिंदे गट असू शकतो. दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीनंतर या राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. तृणमूल काँग्रेसमधील एका नाराज गटाने पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील या संभाव्य घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांचा भाजपावर संताप
जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सत्तेत आहेत, तोपर्यंत देशात पक्षफुटीची परिस्थिती कायम राहणार आहे. तुम्ही आधी तृणमूल काँग्रेसचे खासदार फोडता, नंतर शिवसेना (ठाकरे गट) फोडण्याची भाषा करता आणि आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळता. अजून किती पक्ष फोडणार आहात? तुमच्याकडे देशात करण्यासारखे दुसरे कोणतंही काम उरलेले नाही का? असा संतप्त सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला.
