Sanjay Raut: “बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर सर्वात मोठे सेक्युलर होते”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘शिवसेना सेक्युलर झालीय’, या प्रश्नावर बोलताना राऊतांनी सेक्युलर असणे पाप आहे का? असा प्रतिप्रश्न केला. भाजपा केवळ धर्मांचे राजकारण करत असल्याचा आरोप करत राऊतांनी, “आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडणार नाही”, असे स्पष्ट केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर मन की बात करायला पाहिजे”, असेही राऊत म्हणाले.

राम मंदिर देणगी गैरप्रकारावरुन टीका

ठाकरे गटाच्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नागपूरमध्ये आहेत. यावेळी राऊतांनी स्थानिक युसीएन या हिंदी युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राऊतांनी यावेळी राम मंदिर देणगी घोटाळ्याचा उल्लेख केला. “राम मंदिरासाठी आंदोलनं झाली त्यावेळी नरेंद्र मोदी, अमित शाह नव्हते. बाबरी पाडली जात होती तेव्हा हे लोक पळून जात होते आणि आता मंदिराचे ठेकेदार झाले आहेत”, अशी टीका राऊतांनी केली. आम्ही प्रभू रामाचे रक्षक आहोत म्हणून रामरक्षा आंदोलन करत आहोत, असे सांगताना “राम मंदिराची ट्रस्ट ही चोर महामंडळ आहे हे आता सिद्ध झाले आहे, ट्रस्टच्या अध्यक्षांनी या घटनेमुळे कलंक लागल्याचे वक्तव्य केले आहे”, असे राऊत पुढे म्हणाले.

सेक्युलर मुद्यावर स्पष्ट केली भूमिका

‘शिवसेना सेक्युलर झालीय’, या प्रश्नावर बोलताना राऊतांनी सेक्युलर असणे पाप आहे का? असा प्रतिप्रश्न केला. “बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर सर्वात मोठे सेक्युलर होते. आज प्रत्येक मुद्यावर हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान सुरु आहे. कधीतरी भारत-चीन देखील करा, कधी भारत-इस्रायल करा, ट्रम्पने सगळा देश लुटला कधी भारत-अमेरिका पण करा, पण धर्माचे राजकारण केले जाते. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडणार नाही”, अशी भूमिका राऊतांनी मांडली.

दंगलीचा संदर्भ

“अयोध्येच्या घटनेनंतर मुंबई, महाराष्ट्रात दंगली झाल्या त्यावेळी हिंदुंची रक्षा आम्ही केली, असे राऊत म्हणाले. ४०० लोक मारले गेले, बाळासाहेब ठाकरे त्यावेळी होते. हिंदुंवर संकट आले त्या-त्या वेळी आम्ही हत्यारं घेऊन बाहेर पडलो, आम्ही घाबरलो नाही, १३ बॉम्बस्फोट झाले त्यावेळी शिवसेना भवनाला टार्गेट करण्यात आलं, शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं, भाजपाला नाही”, असे राऊत म्हणाले.

…तेव्हा सगळे भाजपा सोडून, सेक्युलर होतील – राऊत

हिंदुत्वावरुन उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नामागे राजकारण असल्याचा आरोप राऊतांनी केला. “सत्ता जाईल त्यावेळी ९० टक्के भाजपा रिकामी होऊन सर्व सेक्युलर होतील”, असेही राऊत पुढे म्हणाले. “फडणवीस नेतृत्व करत असलेली भाजपा ९० टक्के काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे, अजित पवारांचा गट हिंदुत्ववादी आहे का? विखे पाटील, नारायण राणे हिंदुत्ववादी आहेत का? सावरकरांना पहिल्यांदा माफीवीर म्हणणारे नारायण राणेंचा मुलगा आहे. आरएसएसला हाफ चड्डी बोलणारे नारायण राणेंचे सध्या मंत्री असणारे पुत्र आहेत. सत्ता जाईल त्यावेळी हे सगळे पक्ष सोडतील”, असे राऊत म्हणाले.