एकीकडे शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेना डळमळीत झाली आहे. तर दुसरीकडे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी शिवसेना सोडणार नाही”; सुनील राऊतांची प्रतिक्रिया

पक्ष सोडलेल्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागली

प्रत्येक बंडखोर आमदारांना बाळासाहेबांची हाय लागली असल्याचे म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. खूप कष्टाने बाळासाहेबांनी हा पक्ष निर्माण केला आहे. ज्या ज्या व्यक्तींनी हा पक्ष सोडला त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागली असल्याची टीकाही सुनील राऊत यांनी केली आहे. गेले महिनाभर आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा ऐकत आहोत. दामिनी चित्रपटातील तारीख पे तारीख सारखी राज्याची अवस्था झाली असल्याचेही राऊत म्हणाले.

हेही वाचा- उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले…

शिंदेंना पश्चाताप झाला तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधावा

मैत्री दिनानिमित्त शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत, शहाजी पाटील, शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरुनही सुनील राऊत यांनी बंडखोरांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी कोणालाही पक्षातून बाहेर काढलं नसून एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले होते. जर शिंदेंना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क करावा असेही सुनील राऊत म्हणाले.