Sanjay Raut Cancer Reason: पत्रा चाळ जमीन घोटाळा आणि गैरव्यवहार प्रकरणात राज्यसभेचे खासदार संजय राऊत १ ऑगस्ट २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२ या काळात १०१ दिवस मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात होते. तुरुंगवासाचे दिवस त्यांनी शब्दबद्धही केले आहेत. या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. यातून अनेक धक्कादायक खुलासेही समोर आले. दरम्यान, या पुस्तकातही नसलेला एक दावा आता समोर आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याने त्यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

“माझ्या कॅन्सरचं मूळ तुरुंगात आहे. तुरुंगातून आल्यानंतर मला कॅन्सरचं निदान झालं”, असं संजय राऊत कोल्हापुरात महाराष्ट्र दिनमानला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांना पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत पुन्हा विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत.

तुरुंगातील खाण्यामुळे तुम्हाला कॅन्सर झालाय असा तुम्ही दावा केला. तुरुंगात तुमच्यावर स्लो पॉयजनिंगचा प्रकार झाला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “असं मला आता वाटायला लागलं आहे.”

राहुल गांधींनी टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली

ते पुढे म्हणाले, “दहा दिवसांपूर्वी राहुल गांधी मला भेटले होते. या भेटीत त्यांनी माझ्या आजाराविषयी माहिती घेतली. त्यांनीही असा संशय व्यक्त केला. आपल्यासारख्यांच्या बाबतीत तुरुंगात काहीही होऊ शकतं, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी मला एक टॉक्सिक टेस्ट करून घ्यायला सांगितली आहे. माझ्या शरीरात विषबाधेचा प्रकार झालेला दिसतो, असं राहुल गांधींना वाटतंय. त्यामुळे त्यांनी मला टॉक्सिक टेस्ट करून घ्यायला सांगितली आहे. सरकार इतकं क्रूर आहे की तुरुंगात असताना काहीही करू शकतं. तुमच्यासारख्या माणसाला अशाप्रकारचा आजार का व्हावा? असं राहुल गांधी म्हणालेत. तुरुंगात असताना या आजाराची सुरुवात झाली, असं माझ्या लक्षात येतंय.”

दरम्यान, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीच संजय राऊत यांना पोटाच्या कर्करोगाचं निदान झालं. या गंभीर आजारानंतर त्यांनी घरी आणि रुग्णालयात राहून किमोथेरपी आणि रेडिएशनचे त्रासदायक उपचार घेतले असल्याचंही अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.