सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वादग्रस्त आणि अश्लील वक्तव्य करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वक्तव्याचे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून, राऊत यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अब्रूनुकसानीसह शांतता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, “संजय राऊत म्हणजे राजकारणातील ‘शोले’ चित्रपटातील ‘असरानी’ आहेत,” असा घणाघाती टोला भाजपचे शहर मध्य मतदारसंघातील आमदार देवेंद्र कोठे यांनी लगावला आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

शनिवारी (१ ऑगस्ट) सोलापूर दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याचे तीव्र पडसाद रविवारी उमटले. सोलापूर महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (२) (अब्रूनुकसानी) आणि कलम ३५२ (शांतता भंग करणे व अवमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप युवा मोर्चाचे तीव्र आंदोलन; राऊतांच्या पुतळ्याचे दहन

पालकमंत्री गोरे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमधील संताप अनावर झाला. रविवारी दुपारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील ‘चार हुतात्मा पुतळा चौक’ येथे एकत्र येत खासदार राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. खासदार राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष येत्या काळात आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

“संजय राऊत यांच्या वैचारिक दिवाळखोरीमुळेच ठाकरे गट आणि महाविकास आघाडी रसातळाला गेली आहे. जयकुमार गोरे हे अपक्ष लढून सलग चार वेळा आमदार झाले असून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या पक्षविस्तारात मोठे योगदान दिले आहे. स्वतःच्या गावात साधी ग्रामपंचायत किंवा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता नसलेल्या राऊतांनी गोरेंशी बरोबरी करू नये. त्यांनी आधी आपल्या बूथवरील कार्यकर्त्यांशी सामना करून दाखवावा!” — देवेंद्र कोठे, आमदार, भाजप (सोलापूर शहर मध्य)