Sanjay Raut On Ajit Pawar Death : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपाला घेरल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राऊतांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही शंका उपस्थित केल्या. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या सखोल न्यायिक चौकशीची मागणी केली आहे.

संजय राऊत भाजपा सरकारवर टीका करताना म्हणाले की, हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेले आहे. संपूर्ण देशभरातील भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र आणून सरकार उभं करतात, सरकार पाडतात, आमदार-खासदारांना विकत घेतले जाते. आम्ही निवडून आणतो, तुम्ही रेडिमेड विकत घेता… पूर्वी आपण नेत्यांना तयार करायचो, आता आपण विकत घेतो. ही तुमची लोकशाही आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

पुढे बोलताना संजय राऊतांनी अजित पवार यांची आठवण काढली ते म्हणाले की, “आज मला अजित पवार यांची आठवण येत आहे. महाराष्ट्रातील मोठे नेते होते. तुमचे तीन वर्षांपासन सहकारी देखील राहिले. त्यांचे दुर्दैवी निधन झाले. आजही आम्ही हे कसे घडले या धक्क्यात आहोत.”

अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप तुमच्या (भाजपा) सरकारने केला, पण ते भारतीय जनता पार्टीबरोबर आले आणि पवित्र झाले. १५ जानेवारी रोजी अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीला एक उत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, जर तुम्ही माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करत असाल, तर सिंचन घोटाळ्याचा पैसा फक्त आम्ही खाल्ला नाही. भारतीय जनता पार्टीने देखील या सिंचन घोटाळ्यात भरपूर पैसा खाल्ला आहे आणि भारतीय जनता पार्टीची फाईल माझ्याकडे आहे, हे अजित पवारांचे वक्तव्य १५ जानेवारी रोजी आले. यानंतर १० दिवसांनी अजित पवारांचा विमान अपघात मृत्यू होतो… मी आरोप करत नाही. पण हा मृत्यू रहस्यमयपूर्ण आहे.”

अजित पवारांनी ज्या फाईलवरून आरोप केले, ती फाईल अपघातावेळी अजित पवार यांच्याकडे होती असा दावा संजय राऊतांनी केला आहे. “तुमच्यावर आरोप केला… फाईल कुठे आहे? माझी माहिती आहे की, अजित पवार नेहमी ती फाईल स्वतःजवळ ठेवत. जेव्हा मुंबईहून ते बारामतीकडे निघाले तेव्हाही ती फाईल त्यांच्यासोबत होती आणि अर्ध्या तासात अजित पवार यांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. त्याचा तपास झाला पाहिजे आणि ही चौकशी एक स्वतंत्र न्यायिक चौकशी असली पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांचा अपघात पाहिल्यानंतर मला जस्टिस लोया यांची आठवण आली. तसाच प्रकारची घटना तर घडली नाही ना? असा प्रश्नही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.