पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबईत विरोधी बाकांवर १०० पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान-राऊत
मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर १०० पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले. भाजपला कुठं जागा मिळाल्या, जिथं परप्रांतीय बहुसंख्य आहेत,ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय न राहिली काय? ज्यांना मराठी माणसाचं अस्तित्व या राज्याच्या राजधानीत अशा लोकांनी भाजप आणि शिंदेंना मतदान केलं. जो या मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे तो ठाकरेंच्या मागं राहिले आहेत याचा आनंद आहे, असं संजय राऊत म्हणाले. एवढंच नाही माझ्या हातात सत्ता दिली तर भाजपाचे १५ तुकडे करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या हातात २०२९ च्या पूर्वी पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नाही-संजय राऊत
२०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल. शिंदे यांच्याकडे त्यांचा पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना वाकून पुष्पगुच्छ दिला आहे तरी त्याचा फायदा होणार नाही. भारतीय संविधानातील १० व्या सूचीनुसार धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल. एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर डाऊन होईल, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंना भाजपात विलीन व्हावं लागेल अशी स्थिती येईल. कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलं नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईला पांगळं करण्याचं काम मोदी आणि शाह यांनी केलं-राऊत
सध्या महाराष्ट्रात लोकांना पैशांची चटक लागली आहे. साखर कारखाने वाचवण्यासाठी अनेक लोक भाजपात जात आहेत. मराठी माणसाचं अस्तित्त्व जपण्यासाठी आक्रोश करणारी ही शेवटची पिढी आहे. पुढच्या पिढ्यांना काही फरक पडणार नाही. आम्ही मुंबईसाठी एकत्र आलो, ठाकरे एकत्र आले. मुंबईत मराठी नगरसेवक आम्ही निवडून आणले. मुंबई वेगळी करण्याचा प्रस्ताव आला तर हे नगरसेवकच लढणार आहेत, त्या दृष्टीने मी म्हणतोय की शेवटची लढाई आहे. मुंबईला सध्या पांगळं करण्यात आलं आहे. शाह आणि मोदींनी मुंबईचं महत्त्व कमी केलं. धारावीत जिथे जाल तिथे अदाणींचा बोर्ड दिसतोय. टोलनाक्यांवर अदाणींचा बोर्ड आहे. घाटकोपरला एक होर्डिंग पडून अपघात झाला आणि ४० लोक ठार झाले, त्या जागेवर आता अदाणींचा बोर्ड लागला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
