अजित पवार, नाना पटोले हे सगळे राज्यातले प्रमुख नेते आहेत. समर्थकांनी नाना पटोलेंचं बॅनर लागलं आहे. ते काही नेत्यांनी लावायला सांगितलं नाही. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलं आहे असं म्हणत नाना पटोले भावी मुख्यमंत्री या बॅनरवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अजित पवारांविषयी जे बोललो त्याचा मला खेद वाटतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवारांनी तुमच्याविषयी असं असं बोलले, ते असं बोलले नाहीत. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याने आम्ही पटकन बोलून जातो. अजित पवार म्हणाले होते की महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य आहे मी सहमत आहे. अजित पवार असंही म्हणाले की थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला. मात्र मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिलं. मला त्याचा खेद वाटतो आहे.” असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे.




नेमकं काय घडलं होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे पत्रकारांनी श्रीकांत शिंदेचा प्रश्न तिथेच संपवला आणि पुढच्या विषयांवर चर्चा सुरू झाली.
अजित पवारांनी काय म्हटलं होतं?
“आपली काही संस्कृती, परंपरा आहे, इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी यशवंतराव साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं काम करू शकतो याबाबत दाखवून दिलं आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, संजय राऊतांची दुसरी बाजू ऐकायला मिळाली की त्यांना कसालतरीही त्रास होतोय. परंतु, प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं”, असं अजित पवार (२ जून) म्हणाले होते.
संजय राऊत अजित पवारांविषयी काय म्हणाले होते?
प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर पत्रकारांनी याबाबत संजय राऊतांना विचारले. “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. तसंच “ज्याचं जळतं त्याला कळतं”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. “आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.