संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राज्यसभा उमेदवारीसंदर्भात मोठी घोषणा केली. आत्तापर्यंत भाजपाकडून राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आता अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. तसेच, सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं असलं, तरी गुरुवारी त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यासंदर्भात आता तर्कवितर्कांना उधाणा आलं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे या चर्चेला बळ मिळालं असताना संजय राऊतांनी त्यावर खुलासा करताना राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनाच सहावी जागा लढवणार

“शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्यसभेच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी सहा सदस्यांची टर्म संपून त्या जागी नव्या सदस्यांची निवड केली जाते. यानुसार संभाजीराजे छत्रपती यांची देखील टर्म संपत असून त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

“काही लोकांना शहाणपण आलं तर…”, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर संजय राऊतांचा निशाणा!

अपक्ष निवडणूक का?

संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. ते म्हणाले होते, “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचं हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं.”

“फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल गेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut clarifies on sambhaji raje chhatrapti rajyasabha nomination pmw
First published on: 20-05-2022 at 11:27 IST