Sanjay Raut पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच घटनास्थळी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासह पोलीस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. तसेच या घटनेत ३८ जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती सांगण्यात आली, दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
पालकमंंत्री असल्या कामांसाठी झोपा काढतात-संजय राऊत
पालकमंत्री अशा लहानसहान कामांमध्ये झोपलेले असतात. बिल्डर्सची कामं, ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? हे अजित पवारांनी सांगितलं पाहिजे. तसंच सरकार याबाबतीत किती गंभीर आहे? त्या पुलाच्या निर्मितीसाठी कागदावर पैसे मंजूर केलेत मग पूल झाला का नाही? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मतं विकत घ्यायला, आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे मिळतात. लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. मात्र एका पुलामुळे जे बळी गेले तो पूल दुरुस्त करायला पैसे मिळत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
कुंडमळा रस्त्यासाठी फक्त ८० हजारांचा निधी, माझ्याकडे पत्र आहे-संजय राऊत
एक पत्र मला सापडलं आहे. ११ जुलै २०२४ रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी कुंडमळा रस्त्याचं काम आणि इंद्रायणी नदीवर पुलाला मंजुरी दिली. हे त्यांनी कुणाला कळवलं? रविंद्र भेगडे अध्यक्ष मावळ तालुका यांना कळवलं. मंत्री सही करतानाही झोपून असतात बघा. ८ कोटींचं काम आहे पण पत्रात उल्लेख आहे ८० हजार रुपयांचा. त्यामुळे किती गांभीर्य आहे बघा. माझा चष्म्याचा नंबर बदलेला नाही. तुम्हीही हे पाहून घ्या असं संजय राऊत पत्रकारांना म्हणाले. पीएने पत्र टाइप केलं, यांनी सही करुन टाकली. यात ८० हजारांचा उल्लेख आहे. हे पत्र मंत्री रवींद्र चव्हाण देतात. पूल कोसळून लोक वाहून गेले, मृत्यू झाले. हे सगळं या भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रति प्रेम आहे. अजित पवार काही बोलल्याचं मी पाहिलं नाही. पालकमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत पण तुमची चौकशी केली पाहिजे कारण तुम्ही आल्यापासून दुर्घटनांची मालिका राज्यात सुरु आहे. रविवारचे बळी हे भ्रष्टाचार आणि बेफिकिरीचे बळी आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला.