काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांचा समकक्ष मानलं पाहिजे असं विधान केलं होतं. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे असं म्हणत आम्ही टिपू सुलतानचं उदात्तीकरण सहन करणार नाही असं विधान केलं होतं. आज याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसह क्रिकेट कसं काय खेळता? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानणारा देश-संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानचा विषय काढला. त्याचं उदात्तीकरण वगैरे म्हणाले. पाकिस्तान टिपू सुलतनला नायक मानतं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसा पाकिस्तानमधे टिपू सुलतान नायक आहे. त्या पाकिस्तानबरोबर जर भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. पाकिस्तानमधे टिपू सुलतानवर धडे आहेत, पुतळे आहेत. त्यांच्यासाठी तो योद्धा आहे. असं असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती उचबंळून वर आली आहे तर मग त्यांनी पाकिस्तानसह क्रिकेट खेळणार नाही हे सांगितलं पाहिजे पण हे सांगणार नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मागच्या सामन्यात पाकिस्तानला २५ हजार कोटी मिळाले, संजय राऊत यांचा दावा
संजय राऊत पुढे म्हणाले, या क्रिकेटमधून पैसे मिळतात. शेकडो, शेकडो कोटी रुपये मिळतात. भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. मागच्या सामन्यातून पाकिस्तान २५ हजार कोटी गेले. त्या बेटिंगमधला काही वाटा काही लोकांना जात असतो. सर्वाधिक बेटिंग पाकिस्तानवर लावला जातो. हाच पैसा पुलवामा, उरी, पहलगाम या ठिकाणी जे अतिरेकी येतात त्यांना पुरवला जातो. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ही ढोंगं आहेत ती उघडी पडत आहेत. पाकिस्तानसह क्रिकेट नको हे एक तरी भाजपाचा माणूस सांगतो आहे का? जो पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो, हिरो मानतो, योद्धा मानतो त्याच्याबरोबर क्रिकेट कसं खेळू शकता? असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं आहे ते बघू. आधी धमक्या कुणी दिल्या आहेत? भाजपानेच ना मग पाकिस्तानबरोबर क्रिकेट कसं चालतं?
टिपू सुलतानला मानणारे भाजपात गेले म्हणजे पवित्र झाले का?
काही बगीच्यांची नावं, काही रस्त्यांची नावं यांना टिपू सुलतानचं नाव दिली आहेत. भाजपाचे लोक आहेत त्यामागे. मानखुर्दमध्ये एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला. टिपू सुलतानवाले लोक तुम्ही भाजपात गेले म्हणजे ते काय पवित्र झाले का? देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करायला हवा होता. रितू तावडे असो किंवा आणखी कुणी असो हे सगळे टिपू सुलतानलाच मानणारे आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
