महाराष्ट्रात गॅस सिलिंडर्सचा तुटवडा भासणार नाही याची काळजी केंद्राकडून घेतली जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेलांवर आता नवा आरोप केला आहे. आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातली पाच महत्त्वाची विधानं काय.
सिलिंडर्सचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेतली जाते आहे-एकनाथ शिंदे
“गॅस सिलिंडर्सचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जातेय. केंद्र सरकार गांभीर्याने याकडे लक्ष देत आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. पुणे, मुंबई या ठिकाणी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर तात्पुरते स्वरूपात बंद केल्याने घरगुती गॅसधारकही धास्तावले आहे. त्यातच, घरगुती गॅस सिलिंडरही आता ४५ दिवसांनी मिळणार असल्याने एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली. मात्र काळजीचं काही कारण नाही अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलं आहे.
विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेल बाबत काय म्हणाले योगेश कदम?
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाचा मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी आल्याने खळबळ उडाली. यानंतर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय झालं त्याची माहिती दिली धमकीचा मेल आल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना योगेश कदम म्हणाले की, “ई-मेल आला होता ही बाब खरी आहे. अजून ईमेलचा सोर्स काय होता, ई-मेल कोणी पाठवला होता याचा तपास चालू आहे. अनेकवेळा धमक्यांचे हॉक्स ईमेल्स येत असतात. प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा ई-मेल असावा असा अंदाज आहे. तथापि विधिमंडळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॅडने येथे येऊन पाहाणी आणि तपासणी केली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे. येथे कुठलाही प्रकारचा धोका नाही.” असं योगेश कदम म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
महाराष्ट्राच्या विधानभवनात अधिवेशन सुरु असताना बॉम्ब ठेवल्याची अफवा आहे. आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना कुणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस करेल असं वाटत नाही. गृहमंत्री म्हणून खरंतर देवेंद्र फडणवीस काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. ज्या पद्धतीची हुकूमशाही देशात आणि राज्यात सुरु आहे त्यामुळे विरोधक म्हणून आम्ही निषेधच करु शकतो. अफवा जरी असेल की बॉम्ब ठेवला आहे तरीही राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी हे आव्हान आहे. विधान भवनाच्या बाजूला असलेल्या हॉटेल ताजवर २६/११ ला हल्ला केला होता. ट्रायडंटवर हल्ला केला होता. आता बॉम्बची अफवा आली आहे याचा अर्थ मुंबई सुरक्षित नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप
अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. दादांना न्याय देण्याचा विषय आहे. महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केंद्रात मी इथल्या मंत्र्यांना भेटलो. सीबीआय विभाग हा देखील केंद्राच्या अख्यत्यारीत येतो. मी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी एक मार्ग आम्हाला सांगितला आहे. मी त्याबाबत दोन दिवसांनी भाष्य करेन असं रोहित पवार म्हणाले. प्रफुल पटेल आणि व्ही. के. सिंग यांचे कौटुंबिक संबंध आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच प्रफुल्ल पटेल यांनी काही गोष्टी समोर येऊन सांगितलं होतं. अजितदादांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकला असेल. तर सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांना ही कल्पना द्यायला हवी होती की व्ही. के. सिंगच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो होतो. लग्नात कोण होतं? तेच नेते त्याला वाचवत आहेत का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी विचारलं आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती असल्याने अभिवादन करण्यासाठी मी इथे आले आहे. मी २ फेब्रुवारीलाही या ठिकाणी आले होते. एक कर्तव्यनिष्ठ म्हणून मी या ठिकाणी आले होते. अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा घेऊन वाटचाल केली होती. मी सुद्धा याच पद्धतीने वाटचाल करण्याचा शब्द देते असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. आज सुनेत्रा पवार कराड येथील प्रीतसंगमावर उपस्थित होत्या. तिथे त्या भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.
