Sanjay Raut criticizes BJP: “देशात अराजक माजण्याची शक्यता असून, लोकं रस्त्यावर उतरतील, अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल,” अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपावर टीका केली. नुकत्याच पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकारला नमविण्यासाठी महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. राऊतांनी प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले.
काँग्रेस खानदानी श्रीमंत होते – संजय राऊत
“डिलिमिटेशन बिल पुन्हा घेऊन येण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. आमच्या लोकांवर देखील हात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आमच्यासह राष्ट्रवादीने देखील मजबूत तटबंदी केली. आमच्या लोकांपर्यंत मोठ्या ऑफर्स घेऊन आलेले त्यांचे लोक पोहोचू शकले नाहीत. पण, आमचे बहुसंख्य खासदार विचलित होण्याच्या स्थितीत नाहीत. अतंत्य नीच पातळीला जाऊन काम सुरु असून, असं काम व्यापारीच करु शकतो”, अशी टीका राऊतांनी केली. “काँग्रेसने असं कधीच केलं नाही. ते खानदानी श्रीमंत होते. तर हे (भाजपा) चोरांचे झालेले श्रीमंत आहेत”, असा घणाघातही राऊतांनी केला.
लोक रस्त्यावर उतरतील
अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप स्वत: मोदींनी केला. अशोक चव्हाण, प्रफुल पटेलांवर जाहीर भाषणांमधून मोदींनी आरोप केले. त्यानांच आता मांडीवर घेऊन बसता? म्हणजे एकतर आरोप खोटे होते किंवा तुम्ही निर्लज्ज आहात, अशी कठोर टीका राऊतांनी केली. विविध पक्षात फूट पडत असताना आणि इतर घडामोडी घडत असताना मोदींच्या विरोधात लढण्याची ताकद विरोधकांमध्ये राहणार का? किंवा त्याबाबत विरोधकांकडे काय रणनिती आहे? असा प्रश्न विचारला असता राऊतांनी, “देशात अराजक माजण्याची शक्यता व्यक्त केली. लोकं रस्त्यावर उतरतील, अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही, आम्ही आशावादी आहोत”, असेही राऊत म्हणाले.
न्यायालयावर टीका
“इंदिरा गांधींचा ५६,००० मतांनी पराभव झाला, संजय गांधी पावणे दोन लाख मतांनी पराभूत झाले, त्यावेळी विश्वास बसला नाही. पण, तेव्हा लोकशाही सदृढ होती. इंदिरा गांधींनी गैरमार्गाचा अवलंब करुन निवडणुका जिंकल्या नाहीत, त्या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या. तसे हे लोक आहेत का? इंदिरा गांधी व्यापारी नव्हत्या, त्यांच्या चुका झाल्या असतील पण, त्यांनी जनतेशी आणि देशाशी बेईमानी केली नाही”, असे राऊत म्हणाले. “निकाल आमच्या बाजूने द्यावा लागेल म्हणून न्यायालय तो देत नाही, देशाच्या न्यायालयाचा इतिहास काळ्या अक्षरात लिहावा लागेल”, अशा शब्दात त्यांनी न्यायप्रणालीबाबत खंत व्यक्त केली.
इंडिया आघाडीच्या बैठकीत हेमंत सोरेन काय म्हणाले?
इंडिया आघाडीच्या बैठकीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक मुद्दा मांडल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. “मी मुख्यमंत्री आहे, मला तुरुंगात टाकले, माझ्यावर आजही प्रचंड दबाव आहे. पण मी दबावाचे दरवाजे बंद करत आणले आहेत आणि मी त्यांच्याशी लढतो आहे. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि लोकांना देखील रस्त्यावर आणावं लागेल. त्याशिवाय हे सरकार नमणार नाही”, असे सोरेन म्हणाले. बैठकीतील सर्व नेत्याची देखील तीच भूमिका होती, असे राऊतांनी सांगितले. तसेच, “लोकांना ते का रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांना देखील का उतरावे लागेल हे सांगण्याची गरज आहे. देशात अराजक माजण्याची शक्यता आहे आणि दुर्दैवाने शिवसेनेने २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर काढली त्याच पक्षामुळे अराजक माजणार आहे”, असेही राऊत म्हणाले.
