Sanjay Raut criticizes PM Modi: “वय वाढले म्हणून नेहरु होता येत नाही”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “नेहरुंनी पक्ष फोडले नाहीत. आमदार, खासदार विकत घेऊन राज्य केलं नाही. ते लोकांचे नेते होते. तुम्ही आहात का?,” असा सवाल उपस्थित राऊतांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. देशावर व्यापरी राज्य करत असल्याची टीका देखील राऊतांनी तृणमूल काँग्रेसच्या पक्षफुटीवर बोलताना केली.
देशावर व्यापरी राज्य करत आहेत – संजय राऊत
संजय राऊतांनी नुकतेच प्रशांत कदम यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी तृणमूल काँग्रेसमधील पक्षफुटी, न्यायव्यवस्था, इंडिया आघाडीची बैठक यावर भाष्य केले. तृणमूल काँग्रेसच्या पक्षफुटीवर बोलताना संजय राऊतांनी हा गुजरात पॅटर्न असून देशावर व्यापरी राज्य करत असल्याची टीका केली. “गेल्या १२ वर्षात एवढी दहशत निर्माण केली आहे की कोणी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. भाजपाच्या हायकमांडने त्यांच्या नेत्यांच्या जेवणात अफू किंवा भांग मिसळला आहे त्यामुळे ते बेधुंद आहेत. पण, त्यांनी डोळे उघडले तर त्यांच्या लक्षात येईल का हा देश नष्ट होतोय,” असे राऊत म्हणाले. देशातील सरन्यायाधीशांवर देखील टीका करताना त्यांनी सरकारचे एजंट असल्याचे जाहीर करावं, असे राऊतांनी म्हटले.
सरन्यायाधीशांवर टीका
“घटनेच्या १० व्या शेड्युलमध्ये गटाला किंवा उपगटाला मान्यताच नाही. विलिनीकरण हा मार्ग घटनेने दाखवून दिला असेल तर, निर्णय का दिला जात नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. संविधान कळत नसेल तर सरन्यायाधीश कसले? असाही घणाघात राऊतांनी केला. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली हे सांगायला कोणाची गरज नाही. शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष अजित पवारांकडे दिला जातो, ही कोणती लोकशाही?,” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. “पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या पक्षफुटीवर बोलताना एवढा निर्लज्जपणा बरा नाही”, असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला.
मोदी-नेहरु तुलनेवर भाष्य
“नरेंद्र मोदी म्हणतात मी एक तपपूर्ती केली. आणि त्यांची तुलना नेहरुंशी केली जाते. नेहरूंनी १२ वर्षे केली आता मोदी त्यांच्या पुढे. पण, वय वाढले म्हणून नेहरु होता येत नाही. नेहरुंनी असे पक्ष फोडले नाहीत. आमदार, खासदार विकत घेऊन राज्य केलं नाही. ते लोकांचे नेते होते. तुम्ही आहात का? पश्चिम बंगालमध्ये पाशवी बहुमत मिळाले असताना अशाप्रकारे विरोधीपक्ष संपवून टाकता? महाराष्ट्रात तेच केलं, आप फोडली, अकाली दल फोडला. कसली चटक लागली आहे? तुम्हाला यापेक्षा वेगळं काही सुचत नाही का?”, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. “यांची डोकी व्यापाऱ्याची असून, नफा – तोटा यापलिकडे त्यांना काही जमतच नाही”, असेही राऊत पुढे म्हणाले.
पक्षफुटीवरुन टीका
“एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल यांनी पक्ष कधी स्थापन केले? या सर्वांचे पक्ष अमित शाहांनी स्थापन केले. या पक्षांचे संस्थापक- अध्यक्ष अमित शाह आहेत. त्यांनी पक्षाचा वर्धापनदिन अहमदाबादमध्ये साजरा करावा, असा टोला राऊतांनी लागवला. मोदी-शाहांनी माणसातील स्वाभीमान मारुन टाकला. तृणमूल काँग्रेस भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, सुवेंदू अधिकाऱ्यांचे व्हिडीओ दाखवणाऱ्या मोदींनी पश्चिम बंगालमध्ये त्यांनाच मुख्यमंत्री केले”, असेही राऊत म्हणाले.
